CoronaVirus News: ३५ राज्यांतील व्यवहार होणार सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 04:00 AM2020-05-01T04:00:29+5:302020-05-01T06:41:36+5:30
आताचा काळ अमेरिकेसाठी वाईट असला तरी येणारा काळ निश्चितच चांगला असेल, असे आश्वासक बोलही त्यांनी या वेळी व्यक्त केले.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील तब्बल ३५ राज्यांनी अर्थचक्राचे रुतलेले चाक बाहेर काढण्यासाठी योजना सादर केली असून, काही राज्यांनी केंद्रीय प्रशासनाशी त्या बाबत संपर्क साधला असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. आताचा काळ अमेरिकेसाठी वाईट असला तरी येणारा काळ निश्चितच चांगला असेल, असे आश्वासक बोलही त्यांनी या वेळी व्यक्त केले. जगभरामधे कोरोनाबाधितांचा आकडा बत्तीस लाखांवर गेला असून, त्या पैकी दहा लाखांहून अधिक रुग्ण एकट्या अमेरिकेतच आहेत. बहुतांश राज्यांनी नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच, अनेक कंपन्यान्यांचे कामकाज वर्क फ्रॉम होम सुरू आहे. बंदमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. जवळपास २ कोटी ६० लाख नोकरदारांनी बेरोजगारीच्या फायद्यासाठी दावे दाखल केले आहेत. दाव्यांची ही संख्या लवकरच तीन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांतून अर्थ व्यवहार सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. ट्रम्प यांनी १६ एप्रिल रोजी व्यवहार हळूहळू सुरु करण्याची सूचनाही केली होती. विमा कंपन्यांना बेरोजगारांना भत्ता द्यावा लागू नये म्हणून या कंपन्या अर्थव्यवहार सुरू करण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही बोलले जात आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहिमधे उणे असेल. मात्र, चौथ्या तिमाहीमधे अर्थव्यवस्थेचा गाडा रुळ्वार येईल. या कठिण स्थितीतील एक मोठी सीमारेषा आपण पार केली आहे. माला, पुढे आशेचा किरण स्पष्ट दिसतोय. पुढील काळात भरपूर मागणी असेल. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षे आपल्यासाठी निश्चितच फलदायी असेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून अमेरिकन नागरिकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने नवीन बाधितांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. कोरोनामुळे देशाला झालेली जखम हळूहळू भरत आहे. देशातील ३५ राज्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी योजना सादर केल्या आहेत. अनेक राज्य केंद्रीय प्रशासनाशी संपर्क साधून सल्ला घेत आहेत. त्यावर आम्ही सातत्याने काम करीत असल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सांगितले.
सोशल डिस्टन्सिंगचा कालावधी वाढविणार नाही : डोनाल्ड ट्रम्प
सोशल डिस्टन्सिंगचे नियम गुरुवारी समाप्त झाल्यानंतर याचा कालावधी वाढविणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प म्हणाले की, पुढील आठवड्यात आपण एरिजोनाला जात आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिला दौरा आहे.