अंतराळात अडकलेले चौघे पृथ्वीवर सुखरुप परतले; सुनिता विल्यम्स का येऊ शकत नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:42 PM2024-10-25T20:42:00+5:302024-10-25T20:42:25+5:30
आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले चार अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले आहेत.
Sunita Williams : गेल्या आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले 4 अंतराळवीर आज अखेर पृथ्वीवर सुखरूप परतले. या चौघांना घेऊन येणाऱ्या यानाने समुद्रात फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ यशस्वी लँडिंग केली. पण, दुसरीकडे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अद्याप पृथ्वीवर परतू शकल्या नाहीत. यानात झालेल्या बिघाडामुळे जुलै महिन्यापासून त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अडकून आहेत.
दरम्यान, आज पृथ्वीवर परतलेल्या अतराळवीरांमध्ये तीन अमेरिकन आणि एका रशियन अंतराळवीरचा समावेश आहे. हे चौघे दोन महिन्यांपूर्वी पृथ्वीवर परतणार होते, मात्र त्यांच्या बोइंग 'स्टारलाइनर स्पेस कॅप्सूल'मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीला उशीर झाला. सुरक्षेच्या कारणास्तव 'स्टारलाइनर स्पेस कॅप्सूल' रिकामे पृथ्वीवर परतले. यानंतर, खराब समुद्र परिस्थिती आणि मिल्टन चक्रीवादळामुळे आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे त्यांच्या परतीला दोन आठवडे उशीर झाला. आता अखेर ते चौघे पृथ्तीवर सुखरुप परतले आहेत.
सुनीता विल्यम्स अजून परत येऊ शकल्या नाहीत
सुनीता विल्यम्स आणि 'टेस्ट पायलट' बुच विल्मोर या दोन स्टारलाइन अंतराळवीरांचे मिशन आठ दिवसांवरुन आठ महिन्यांपर्यंत वाढले आहे. यानातील तांत्रिक बिघाडामुळे हे दोघे आजतागायत पृथ्वीवर परत येऊ शकले नाही. SpaceX ने चार आठवड्यांपूर्वी आणखी दोन अंतराळवीरांना वर पाठवले, ते सर्व फेब्रुवारीपर्यंत तिथेच राहतील. स्पेस स्टेशनमध्ये आता सात क्रू सदस्य आहेत, ज्यात चार अमेरिकन आणि तीन रशियन अंतराळवीरांचा समावेश आहे. दरम्यान सुनीता विल्यम्स कधी परतणार, हे अद्याप ठरलेले नाही.