Galwan Valley China Troops Memorial: गलवानमध्ये मारलेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकासोबत फोटो काढला; ट्रॅव्हल ब्लॉगरला जेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 02:51 PM2021-11-15T14:51:40+5:302021-11-15T14:52:19+5:30
Indian Army killed Chinese Soldiers in Galwan Valley: भारतीय जवानांनी मारलेल्या चिनी सैनिकांच्या कुटुंबाला गुपचूप याची खबर देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांनी या सैनिकांचे स्मारकही बांधण्यात आले होते. हा सगळा कार्यक्रम गुपचूप उरकण्यात आला होता. याच स्मारकाजवळ ट्रॅव्हल ब्लॉगरने काही फोटो काढले होते.
शेजारी देशांना त्रास देणाऱ्या चीनला गेल्या वर्षी भारतीय जवानांनी गलवान खोऱ्यात मोठी जखम दिली आहे. ही जखम एवढी मोठी आहे की चीनने त्या रागात एक ट्रॅव्हल ब्लॉगरला सात महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. या सैनिकांच्या स्मारकासोबत फोटो काढून त्या ब्लॉगरने चिनी सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
गलवान खोऱ्यात भारतीय हद्दीत चिनी सैनिकांनी पारंपारिक शस्त्रे, लोखंडी काटे लावलेल्या सळ्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. खोऱ्यातील वेगवान पाण्यामध्ये भारतीय जवानांनी एकही गोळी न चालविता चिनी सैनिकांना जशास तसे प्रत्यूत्तर दिले होते. या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर 45 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. हे चीन अनेक महिने मान्य करायला तयार नव्हता.
भारतीय जवानांनी मारलेल्या चिनी सैनिकांच्या कुटुंबाला गुपचूप याची खबर देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांनी या सैनिकांचे स्मारकही बांधण्यात आले होते. हा सगळा कार्यक्रम गुपचूप उरकण्यात आला होता. याच स्मारकाजवळ ट्रॅव्हल ब्लॉगरने काही फोटो काढले होते. त्याच्यावर सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यासाठी त्याला झिंजियांग उइगर क्षेत्राच्या पिशा काऊंटीच्या स्थानिक न्यायालयाने सात महिन्यांचा कारावास सुनावला आहे. तसेच 10 दिवसांच्या आत त्या ट्रॅव्हल ब्लॉगरला सार्वजनिकरित्या माफी मागण्याचा आदेश दिला आहे.
ब्लॉगरचे नाव ली किजिआन (Li Qixian) आहे. तो Xiaoxian Jayson नावाने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तो 15 जुलैला त्या स्मारकावर गेला होता. हे स्मारक काराकोरम पर्वतरांगांमध्ये आहे. तो तिथे फोटो काढताना हसत होता, तसेच स्मारकाकडे हाताचे पिस्तूल चिन्ह बनवून दाखवत होता असा आरोप आहे.