Treasure: पॉपकॉर्नच्या डब्यात सापडला अब्जावधीचा खजिना, आकडा पाहून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:55 PM2022-11-10T13:55:24+5:302022-11-10T13:56:13+5:30
Treasure: एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांना या छाप्यामध्ये तब्बल २७९ अब्ज रुपये मूल्यापेक्षा अधिक मूल्याचे बिटकॉईन जप्त केले. जप्त केलेल्या ५० हजार ६७६ बिटकॉईनमधील काही बाथरूममध्ये पॉपकॉर्नच्या डब्यामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बिटकॉईनचा भांडाफोड असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया येथील रहिवासी जेम्स झोंग याने एवढ्या मोठ्या प्रमाणावरील बिटकॉईन हे सुमारे १० वर्षांपूर्वी चोरले होते. त्याने कॉम्प्युटर उपकरणांवर क्रिप्टोकरन्सी सेव्ह करून ठेवली होती. या प्रकरणी जेम्सला दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
छाप्यादरम्यान, जेम्स झेंगच्या घरात तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका अंडरग्राऊंड खोलीत लपवलेली उपकरणे आणि बाथरूमच्या खोलीमध्ये लपवलेल्या पॉपकॉर्नच्या डब्यामध्ये ठेवलेले सिंगल बोर्ड कॉम्प्युटर सापडले. यामध्ये क्रिप्टोकरन्सी स्टोअर करण्यात आली होती. द मिररमधील रिपोर्टनुसार जेम्सने दहा वर्षांपूर्वी डार्क वेब मार्केटप्लेसमधून ३ बिलियन डॉलर सुमारे २७९ अब्ज रुपये मूल्य असलेले बिटकॉइन हॅक केले होते.