बुडालेल्या जहाजात 1.66 लाख कोटी डॉलर्सचा खजिना; ३१६ वर्षांपूर्वी बुडालेले जहाज कोलंबिया सरकार बाहेर काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 07:38 AM2024-02-25T07:38:59+5:302024-02-25T07:40:43+5:30
कोलंबिया खजिना शोधणार, तब्बल सव्वा तीनशे वर्षे समुद्रात बुडालेला
बोगोटा : सुमारे ३१६ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या सॅन जोस या स्पॅनिश जहाजातील खजिना वर काढण्यासाठी कोलंबिया सरकारने पाण्याखाली शोध सुरू करणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. सध्या हे जहाज दोन हजार फूट इतक्या खोलीवर आहे.
शोधकार्यासाठी सरकार एक रोबोटही समुद्रात पाठवणार आहे. विशेष म्हणजे या जहाजात सोन्याची नाणी, दागिने आदी स्वरूपात तब्बल १.६६ लाख कोटी डॉलर्सचा खजिना आहे. त्यामुळे कोलंबियन नौदलाच्या देखरेखीखाली ही मोहीम चालणार आहे.
रोबोटही पाठविणार
शोधमोहिमेत पाठवल्या जाणाऱ्या रोबोटवर नोंदी घेण्यासाठी कॅमेरेही लावले जाणार आहेत. रोबोट उपग्रहाशी जोडलेला असेल. या मोहिमेवर सरकार अंदाजे ३७ कोटी रुपये खर्च करणार आहे.
२०२४ च्या उत्तरार्धात ही मोहीम सुरू होईल. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले की, जहाजाचे अवशेष जपून ठेवण्यासाठी सरकार खास प्रयोगशाळा तयार करणार आहे. अभ्यासानंतर ते राष्ट्रीय संग्रहालयात हलविण्यात येणार आहे.
कधी आणि कसे बुडाले?
nसॅन जोस हे ६२ तोफा घेऊन निघाले होते. ८ जून १७०८ रोजी जहाज बुडाले. हे जहाज अमेरिकेतून स्पेनला खजिना घेऊन निघाले होते. स्पेन या खजिन्याचा वापर इंग्लंडविरोधात करणार
nपरंतु, प्रवासादरम्यान इंग्लंडच्या सैनिकांनी हे जहाज ताब्यात घेतले. दागिन्यांसह जहाजातील सर्व सामान इंग्लंडचे सरकार ताब्यात घेणार होते. परंतु, त्याआधीच जहाजावर असलेल्या पावडरचा स्फोट झाला आणि जहाज बुडाले.
जहाजात काय होते?
बुडाले तेव्हा या जहाजात २०० टन सोने आणि चांदीसह १ लाख ६६ हजार कोटी डॉलर्सचा खजिना होता. १७०८ साली हे जहाज राजे फिलिप पाचवे यांच्या ताफ्यात होते. जहाज बुडाले त्यावेळी जहाजावर ६०० लोक होते, त्यापैकी फक्त ११ जण जिवंत राहिले होते. २०१५ मध्येच कोलंबिया सरकारला या जहाजाचे अवशेष सापडले होेते. जहाजाच्या अवशेषात सोन्याची नाणी-विटा आणि चिनी भांडी आढळली. डॉल्फिनचे ठसे असलेल्या बंदुकाही आढळून आल्या.