स्टेम सेलच्या माध्यमातून गर्भातच उपचार
By admin | Published: October 12, 2015 10:47 PM2015-10-12T22:47:16+5:302015-10-12T22:47:16+5:30
हाडांच्या वाढत्या रोगांवर उपचार करण्यासाठी संशोधक नवा प्रयोग करीत आहेत.
लंडन : हाडांच्या वाढत्या रोगांवर उपचार करण्यासाठी संशोधक नवा प्रयोग करीत आहेत. गर्भातच स्टेम सेलच्या माध्यमातून उपचार करणे शक्य असल्याचा दावा येथील संशोधकांनी केला असून जानेवारीत यावर चाचणी घेण्यात येणार आहे.
इंग्लंडमधील ग्रेट आॅरमंड स्ट्रीट हॉस्पिटल आणि स्वीडनच्या कारोलिंस्का इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तपणे जानेवारीत यावर चाचणी घेण्यात येणार आहे. या उपचारातून हाडांचे रोग कमी होतील असा दावा करण्यात येत आहे. दर २५ हजार बालकांमागे एका बालकास हाडांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
प्रसूतीनंतरचे स्टेम सेल्स या चाचणीकरिता घेण्यात येतील. ग्रेट आॅरमंड स्ट्रीट हॉस्पिटलचे प्रोफेसर लिन चिट्टी यांनी सांगितले की, बालकांमधील अस्थिव्यंग दूर करणे हे आमचे लक्ष्य आहे. हॅम्पशायरच्या अॅडमचे एक उदाहरण डॉक्टरांनी सांगितले आहे. जन्मत:च अॅडमच्या शरीरात फ्रॅक्चर होते. त्याचा डाव पाय उजव्याच्या तुलनेत चार इंच छोटा होता. जन्मत:च असे व्यंग असलेल्या बालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
लंडनच्या किंग्ज कॉलेजचे डॉ. ड्यूस्को लिक याबाबत बोलताना म्हणाले की, असे संशोधन निश्चितच अस्थिव्यंग आणि इतर प्रकारच्या आजारांना रोखण्यासाठी मदतीचे ठरू शकते. (वृत्तसंस्था)