सैनिकांचे बंड मोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2016 07:03 AM2016-07-17T07:03:38+5:302016-07-17T07:03:38+5:30
तुर्कस्तानात लष्करातील असंतुष्ट गटाने उठाव केल्यानंतर झालेल्या संघर्षात २५०हून अधिक लोकांचा शनिवारी बळी गेला. मात्र सरकार समर्थक सैनिकांनी तसेच जनतेने रस्त्यांवर उतरून
अंकारा : तुर्कस्तानात लष्करातील असंतुष्ट गटाने उठाव केल्यानंतर झालेल्या संघर्षात २५०हून अधिक लोकांचा शनिवारी बळी गेला. मात्र सरकार समर्थक सैनिकांनी तसेच जनतेने रस्त्यांवर उतरून बंड मोडून काढले आणि बंडखोर सैनिकांना शरण येण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. जनतेने या सैनिकांना अक्षरश: बुकलून काढले. शस्त्रधारी सैनिकांचे बंड हातात शस्त्रास्त्रे नसलेल्या जनतेने मोडून काढण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा. त्यामुळे बंड फसल्यानंतरही राष्ट्रप्रमुख इरदोगान यांनी जनतेला काही काळ रस्त्यांवरच राहण्याचे आवाहन केले.
अनेक तासांच्या धुमश्चक्रीमुळे तुर्कस्तानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच इरदोगान कुठे तरी गायब असल्याने चिंता वाढली होती. मात्र, पहाटे इस्ताम्बुल विमानतळावर दाखल होऊन इरदोगान यांनी त्यांच्या ठावठिकाण्याविषयीची अनिश्चितता संपुष्टात आणली. विमानतळावर त्यांचे शेकडो कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे, असे पंतप्रधान बिनाली इल्दरिम यांनी अंकारा येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी अनेक लष्करी अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. असंतुष्ट सैनिरांनी केलेला सत्तापालटाचा प्रयत्न हे इरदोगान यांच्या १३ वर्षांच्या राजवटीसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. ते निपटून काढण्यात यश आले असले तरी त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खुद्द इरदोगान यांनीच टष्ट्वीटरवरून तसा इशारा देत लोकांना रस्त्यावर थांबण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही क्षणी बंडाचा पुन्हा भडका उडू शकतो. त्यामुळे काहीही झाले तरी आज रात्री आम्ही रस्त्यावर थांबणे गरजेचे आहे. (वृत्तसंस्था)
असे उधळले बंड
- सैनिकांचा उठाव लोकशाहीप्रेमी तुर्की नागरिकांनी उधळून लावल्याचे दिसते.
- इरदोगान यांच्या सत्ताधरी जस्टीस अॅण्ड डेव्हलपमेंट पार्टीचे हजारो समर्थक संचारबंदीचा आदेश मोडून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बंडाची त्सुनामी थोपवली.
- सत्तापालटाच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून ३००० सैनिकांना अटक करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
- जे काही घडले ते बंड आणि देशद्रोह होता व त्याची त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असे इरदोगान यांनी विमानतळावर सांगितले.
बंडखोरांच्या विमानांचा
संसद भवनावर हल्ला
- तुर्की लष्करातील असंतुष्ट गट शुक्रवारी रणगाड्यानिशी अंकारा आणि इस्तंबुल शहरात दाखल झाल्यानंतर देशातील या दोन मोठ्या शहरात रात्रभर मोठमोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.
- या बंडाला तुर्कीच्या लोकशाहीवरील काळा डाग संबोधून ईल्दीरीम म्हणाले की, कालच्या रात्री १४४० लोक जखमी झाले.
- बंडखोरांच्या विमानांनी अंकारातील संसद भवनावर हल्ला केला. यात संसदेच्या वास्तूची मोठी हानी झाली.