मुस्लिमांबाबत ट्रम्प बॅकफूटवर
By admin | Published: June 27, 2016 04:11 AM2016-06-27T04:11:35+5:302016-06-27T04:11:35+5:30
मुस्लिमांना देशात प्रवेश बंदीची भाषा करणारे रिपब्लिकनचे प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा आता बदललेला दिसत आहे.
बालमेडी (स्कॉटलंड) : मुस्लिमांना देशात प्रवेश बंदीची भाषा करणारे रिपब्लिकनचे प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा आता बदललेला दिसत आहे. ज्या देशात दहशतवाद बोकाळला आहे अशाच देशातील मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये, अशी आपली भूमिका आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, अध्यक्ष ओबामा यांनी मोठ्या संख्येने स्थलांतरित नागरिकांना परत आपल्या देशात पाठविले; पण याबाबत कधी चर्चा झाली नाही. त्या तुलनेत माझी राजकीय धोरणे चांगली आहेत, किंबहुना माझ्या हृदयात सर्वांसाठी जागा आहे.
ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान अशी घोषणा केली होती की, मेक्सिकोच्या सीमेवर आपण भिंत बांधू. याबाबत बोलताना ते म्हणाले की, देशात अवैधरीत्या राहणारे असे ११ लाख नागरिक आहेत. त्याबाबत आपण कारवाई करू आणि अशाच नागरिकांना परत पाठवू. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, जर आपण निवडून आलो, तर अमेरिकेत मुस्लिमांना पूर्ण प्रवेश बंदी घातली जाईल. याबाबत आज यू टर्न घेताना ते म्हणाले की, मी अतिरेक्यांना देशाबाहेर घालवू इच्छितो. अतिरेक्यांशी संबंधित देश कोणते आहेत ते माहीत आहे. (वृत्तसंस्था)