जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:24 PM2024-10-19T13:24:03+5:302024-10-19T13:27:02+5:30
भारत सरकारने फरारी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीच्या एका अधिकाऱ्याचे नाव या यादीत आहे.
गेल्या काही दिवसापासून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढला आहे. आता भारत सरकारने फरारी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिस एजन्सीच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याच्या फोटो आणि नावासही ही यादी भारताने ट्रुडो सरकारला पाठवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सिंह सिद्धू हे प्रतिबंधित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे सदस्य आहेत आणि CBSA साठी काम करत आहेत. सिद्धूवर पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
बलविंदर सिंह सिद्धूच्या हत्येसाठी संदीप सिंह सिद्धू पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी लखबीर सिंह रोडे याच्या संपर्कात होता.
बलविंदर सिंह सिद्धू यांनी १९९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवादाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बलविंदर सिंह सिद्धू यांना दहशतवादाविरुद्ध लढा दिल्याबद्दल शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्या घरातच त्यांची हत्या करण्यात आली होती.
बलविंदर सिंह संधू यांच्या हत्येच्या कटात सुखमीत पाल सिंह उर्फ सनी टोरंटो आणि लखवीर सिंह उर्फ रोडे याचा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. या हत्येनंतर संदीप सिंह सिद्धू यालाही CBSA मध्ये अधीक्षक पदावर बढती मिळाली आहे.
दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारत सरकारचे अधिकारी सामील असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्याचबरोबर भारताने कॅनडाचा हा दावा निराधार असल्याचे म्हटले आहे. ट्रुडो आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.
१८ जून २०२३ रोजी सायंकाळी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वारातून बाहेर आल्यावर निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. २०२० मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.