ट्रम्प यांच्याविरोधात गुगल, फेसबुक, ट्विटरसह 97 कंपन्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 10:17 PM2017-02-06T22:17:50+5:302017-02-06T22:17:50+5:30
गुगल, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सह जवळपास 97 कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
ऑनलाइन लोकमत
सॅन फ्रान्सिस्को, दि. 6 - ट्रम्प सरकारनं सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आता गुगल, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सह जवळपास 97 कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
टेक्नॉलॉजीच्या दुनियेत नावाजलेल्या मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सिलिकॉल व्हॅलीसह 97 कंपन्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत ट्रम्प यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयांमध्ये अचानक बदल केल्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावं लागलं आहे, असं याचिककर्त्या कंपन्यांचं म्हणणं आहे.
या याचिकेचं ट्विटर, नेटफ्लिक्स आणि उबरनेही जोरदार समर्थन केलं आहे. सीएनएनमनीच्या वृत्तानुसार रविवारी नाइंथ सर्किट कोर्ट ऑफ अपील्समध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणारी याचिकाही दाखल करण्यात आली असून, त्या याचिकेवर निर्णय देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. मात्र मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सिलिकॉल व्हॅलीसह इतर कंपन्यांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेचं फेसबुकनं समर्थन केलं आहे. तसेच ईबे आणि इंटेलसोबतच लेव्ही स्ट्रॉस आणि चोबानी या टेक्नॉलॉजीत अग्रेसर असणा-या कंपन्यांनीही मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सिलिकॉन व्हॅलीसह इतर कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे