ट्रम्प आणि हिलरी यांची प्रतिस्पर्ध्यांवर किरकोळ आघाडी
By admin | Published: February 1, 2016 02:05 AM2016-02-01T02:05:11+5:302016-02-01T02:05:11+5:30
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्राथमिक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्राथमिक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. अध्यक्षीय निवडणुकीत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ओयोवा या प्रांतात आपापल्या पक्षाच्या उमेदवारीचा दावा करणारे डेमोक्रॅटस्च्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्ध्यांवर किरकोळ आघाडी घेतल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
महत्त्वाच्या अशा ओयोवा कॉकसपूर्वी, ब्लूमबर्गच्या सहकार्याने डेस मोईनेज रजिस्टरतर्फे जारी अंतिम जनमत सर्वेक्षणचे निष्कर्ष हिलरी आणि ट्रम्प यांच्याबाबत वेगवेगळी चित्र दाखवितात. नवीन सर्वेक्षणात ट्रम्प यांनी सिनेटर टेड क्रूझ यांच्यावर आघाडी घेतली असून, सिनेटर बर्नी सँडर्स यांच्यावर हिलरी यांनी किरकोळ आघाडी घेतली आहे.
डेस माइनेस रजिस्टरने म्हटले आहे की, २०१६ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ओयोवात पुन्हा आघाडी घेतली आहे. २८ टक्के लोकांनी ट्रम्प यांना, तर २३ टक्के लोकांनी क्रूझ यांना पाठिंबा दिला. यापूर्वी १३ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २५ टक्के लोकांनी क्रूझ यांना, तर २२ टक्के लोकांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.
दुसरीकडे सँडर्स यांच्यावर हिलरी यांनी किरकोळ आघाडी घेतली आहे. कॉकसच्या सर्वेक्षणात ४५ टक्के लोकांनी हिलरी यांना, तर ४२ टक्के लोकांनी सँडर्स यांना पसंती दाखविली आहे. यावर भाष्य करताना राजकीय निरीक्षक डेव्हिड अॅक्सेलारोड म्हणाले की, डेमोक्रॅटिक पक्षातील स्पर्धा तीव्र दिसते. गेल्या काही महिन्यांत स्पर्धा वाढल्यास सँडर्स हिलरी यांच्या बरोबर येऊ शकतात.
दरम्यान, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने डेमोक्रॅटस्तर्फे हिलरी यांना, तर रिपब्लिकनतर्फे जॉन कसीच यांना अनुमोदन दिले आहे. (वृत्तसंस्था)