ट्रम्प यांनी मला रशियाची चौकशी थांबवायला सांगितली- कॉमी
By admin | Published: June 9, 2017 07:07 AM2017-06-09T07:07:19+5:302017-06-09T07:07:32+5:30
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. एफबीआयच्या संचालकपदावरून पायउतार झाल्यानंतर जेम्स कॉमी यांनी ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप केल्याचा दावा कॉमी यांनी केला असून, ट्रम्प यांचे रशियाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याकारणानेच त्यांनी मला काढून टाकलं आहे, असं कॉमी म्हणाले आहेत.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी संचालक जेम्स कॉमी यांची गुरुवारी ‘सिनेट’समोर सुनावणी झाली. यात त्यांनी एफबीआयच्या संचालकपदावरून हटवणा-या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, रशियाच्या चौकशीपासून दूर ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी मला पदावरून हटवलं आहे. मला पदावरून दूर करताना ट्रम्प प्रशासनानं कोणतंही ठोस कारण दिलं नाही. मला एफबीआयच्या संचालकपदावरून दूर करण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं माझ्या बदनामीचा कट रचला. ट्रम्प यांनी रशियानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केलेल्या हस्तक्षेप करण्याचा तपास बंद करा, असे कधीही थेट सांगितले नाही. मात्र त्यांची बिनधास्त वागणूक आणि अविचारी व्यक्तिमत्त्व मला चांगलंच परिचित होतं. जेम्स कोमी यांनी सिनेटच्या 15 जणांच्या पॅनलसमोर हे खुलासे केले आहेत.
सुनावणीदरम्यान ट्रम्प वारंवार म्हणाले की, कॉमी फार चांगलं काम करत होते. मात्र ते माझ्या विनंतीवरच या पदावर राहू शकतात. कॉमी यांनी राष्ट्राध्यक्षांच्या ट्विट्सची आठवण करून देताना त्यांच्या संभाषणाची रेकॉर्डिंग झाली असावी, अशी शक्यता वर्तवली. त्यावर ट्रम्प म्हणाले, अशा कोणत्याही रेकॉर्डिंगवरून सत्य जगासमोर येणार असल्यास मला आनंदच होईल. माजी सुरक्षा सल्लागार माइक फ्लिन आणि रशिया यांच्यातील हित संबंधाची चौकशी थांबवावी, असे ट्रम्प यांनी एफबीआयच्या जेम्स कॉमींना सांगितल्याचं वृत्त पसरलं होतं. या पार्श्वभूमीवर कॉमी यांनी सिनेटसमोरील सुनावणीत केलेल्या खुलाशांना अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे.