ट्रम्प यांची प्रचार मोहीम कोसळणार?
By Admin | Published: October 10, 2016 04:29 AM2016-10-10T04:29:21+5:302016-10-10T04:29:21+5:30
अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोही पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोही पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. ट्रम्प यांनी महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील शेरे मारल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील अनेक वरिष्ठ नेते प्रचारातून दूर होत आहेत.
ट्रम्प यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घ्यावी असा दबाब वाढत असतानाही त्यांनी ते दडपण धुडकावून लावले आहे. पुढील महिन्यात ही निवडणूक होणार असून ट्रम्प यांच्या या वर्तनामुळे रिपब्लिकन पक्षाला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही.
२००५ मधील त्या वादग्रस्त व्हिडिओ टेपकडे मी दुर्लक्षही करणार नाही की समर्थनही करणार नाही, असे ट्रम्प यांच्याच पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार माईक पेन्स यांनी म्हटले. या टेपमध्ये ट्रम्प यांनी महिलांबद्दल अत्यंत लैंगिक शेरेबाजी केली आहे. ट्रम्प यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ला दिलेल्या मुलाखतीत मी माघार घ्यायची शून्य शक्यता असल्याचे सांगितले. मी कधीही माघार घेतलेली नाही, मला प्रचंड पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसचे अनेक सदस्य आणि सिनेटर्सनी आमचा ट्रम्प यांना असलेला पाठिंबा काढून घेत असल्याचे शनिवारी जाहीर केले. ट्रम्प हे कधीही अध्यक्ष होता कामा नये, असे स्पष्ट मत माजी परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाच्या किमान नऊ संसद सदस्यांनी ट्रम्प यांचा पाठिंबा काढून घेतला आहे तर किमान दोन डझन सदस्यांनी त्यांना निवडणुकीतून माघार घ्या, असे म्हटले. वॉल स्ट्रीट जर्नलने रिपब्लिकन नॅशनल कमिटी आपला ट्रम्प यांच्यासाठीचा निधी मागे घेर्ईल, असे वृत्त दिले. (वृत्तसंस्था)