ट्रम्प, क्लिंटन यांचा ‘सुपर ट्यूसडे’त विजय
By admin | Published: March 3, 2016 03:33 AM2016-03-03T03:33:44+5:302016-03-03T03:33:44+5:30
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ‘सुपर ट्यूसडे’ शर्यत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (६९) आणि डेमोकॅ्रटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ‘सुपर ट्यूसडे’ शर्यत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (६९) आणि डेमोकॅ्रटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन (६८) यांनी बुधवारी जिंकली. या दोघांमधील सामना महत्त्वाच्या अनेक राज्यांतील मतांनंतर होणार, असे दिसते.
रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रम्प यांना उमेदवारी मिळू शकेल एवढ्या अंतरावर ते आता उभे आहेत.
अत्यंत कर्मठ व मागास म्हणता येतील अशा विचारांबद्दल ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच पक्षातील त्यांच्या स्पर्धकांनी तीव्र शब्दांत टीका केलेली आहे. तरीही ट्रम्प यांनी सात राज्यांत (अलाबामा, अर्कान्सास, जॉर्जिया, मॅसॅच्युसेटस्, टेनेसी, व्हर्मोंट आणि व्हर्जिनिया) विजय मिळविला आहे. हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. त्यांनीही अलाबामा, अर्कान्सास, जॉर्जिया, मॅसॅच्युसेटस्, टेनेसी, टेक्सास आणि व्हर्जिनिया राज्यांत विजय मिळवला आहे. क्लिंटन यांनी आफ्रिकन-अमेरिकन मतदारांत मोठा विजय मिळवला व २००८ मध्ये व्हर्जिनियामध्ये बराक ओबामा यांच्या स्पर्धेत प्राथमिक पायरीवर जो पराभव झाला होता तेथे त्यांनी आता विजय मिळवला. (वृत्तसंस्था)