जेरुसलेम आता इस्रायलची राजधानी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 08:23 AM2017-12-07T08:23:08+5:302017-12-07T12:58:05+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे. अमेरिकी दूतावास तेथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत हिंसक उलथापालथ होईल, असा इशारा अनेक अरब नेत्यांनी दिला आहे.
‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असं आपल्याला ठामपणे वाटतं आणि ती कृती योग्यच ठरेल’, असं डोनाल्ड ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हणाले आहेत.
2016 साली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती आता केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे मध्यपूर्वेत तसंच जगात इतर ठिकाणी व्यापक निदर्शनं होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली आहे. पण, व्हाइट हाऊसमध्ये ही घोषणा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प कायम राहतील, असं त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. डोनाल्ड ट्रम्प याबाबीकडे ‘ऐतिहासिक वस्तुस्थितीला मान्यता’ या दृष्टिकोनातून पाहतात, असं एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितलं
घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी दूतावास तेल अवीव येथून जेरुसलेमला हलवण्याचा आदेश परराष्ट्र खात्याला देणार आहेत. अमेरिकी काँग्रेसमधील बहुतांश सत्ताधारी व विरोधी सदस्यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे. या निर्णयाला मध्यपूर्वेतील देशांचा विरोध असला, तरी त्यामुळे इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्षांवरील दोन राष्ट्रांच्या तोडग्यावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं.
सौदी अरेबियाचे राजे सलमान व मध्यपूर्वेत अमेरिकेच्या अतिशय जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांनी मात्र या मुद्दयावर अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे जगातील मुस्लिमांच्या भावना भडकतील, असं राजे सलमान यांनी म्हटलं आहे; तर यामुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेला खीळ बसेल असं अल-सिसी यांनी सांगितलं.