ट्रम्प पुन्हा माध्यमांवर घसरले
By admin | Published: January 13, 2017 12:54 AM2017-01-13T00:54:51+5:302017-01-13T00:54:51+5:30
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील गुप्तचर संस्था, तसेच मीडिया यांच्यात सध्या जणू युद्धच
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील गुप्तचर संस्था, तसेच मीडिया यांच्यात सध्या जणू युद्धच ट्रम्प यांच्याविषयीची काही धक्कादायक गोपनीय माहिती रशियाकडे आहे, असे वृत्त आहे, पण ट्रम्प यांनी मात्र, हे वृत्त म्हणजे मूर्खपणा असल्याचे सांगत, पत्रकार परिषदेमध्ये गुप्तचर संस्था आणि मीडियाला चांगलेच सुनावले.
अशा वृत्ताचा दावा करणाऱ्या मीडिया आणि गुप्तचर संस्थांना, त्यांनी याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच दिला. ट्रम्प यांनी सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्ससारख्या प्रसार माध्यमांचा अपमानही केला. सीएनएनचे वार्ताहर व ट्रम्प यांच्यात पत्रकार परिषदेमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. ट्रम्प यांनी सीएनएन न्यूज नेटवर्कच्या बातमीला ‘बनावट’ सांगत, त्यांच्यावर टीका केली, तसेच ट्रम्प यांनी ‘बजफीड’ या वेबसाइटवरील अहवालाचा उल्लेख ‘कचरा’ या शब्दात केला.
एफबीआय आणि सीआयएसह अमेरिकेतील चार प्रमुख गुप्तचर एजन्सींनी ट्रम्प आणि ओबामा यांच्या समोर गेल्या आठवड्यात एक अहवाल सादर केला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या हस्तक्षेपाविषयी हा अहवाल होता. वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिल्यानंतर, ट्रम्प यांनी हे वृत्त खोटे असून, ते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे टिष्ट्वट केले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोन्ही उमेदवारांची अडचण होईल, अशी माहिती रशियाने जमा केली होती, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र, हिलरी क्लिंटन अडचणीत येतील, अशीच माहिती समोर आणण्यात आली. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मोहिमेत ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशिया सरकारचे मध्यस्थ यांच्यात माहितीचे आदान-प्रदान होत होते, पण ट्रम्प यांनी हा अहवाल वा माहिती हे सारे बनावट असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)