ट्रम्प यांनी भय आणि क्रोध दिला, तोडगा नाही!
By admin | Published: July 24, 2016 02:15 AM2016-07-24T02:15:00+5:302016-07-24T02:15:00+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्लिव्हलॅण्ड अधिवेशनातील भाषणावर डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्लिव्हलॅण्ड अधिवेशनातील भाषणावर डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केवळ भय आणि क्रोधच सादर केला. कोणत्याही प्रश्नावर कोणत्याही प्रकारचा तोडगा त्यांनी दिलेला नाही, असे हिलरी यांनी म्हटले आहे.
फ्लोरिडा प्रांतातील टंपा येथे आयोजित निवडणूक रॅलीत बोलताना हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विध्वंसक विचारांबद्दल मी ऐकले आहे. काल रात्रीचे त्यांचे
भाषण नव्याच पातळीवर पोहोचले. या संपूर्ण भाषणात त्यांनी भय, क्रोध आणि असंतोष उगाळला आहे. कोणत्याही प्रकारचा तोडगा मात्र त्यांनी सांगितलेला नाही. अमेरिकेच्या नागरिकांनी त्यांचा विध्वंसक दृष्टिकोन नाकारावा, असे आवाहन हिलरी यांनी केले आहे. अमेरिकेचा ऱ्हास होत असून, आपणच अमेरिकेचे पुनरुज्जीवन करू शकतो, या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर हिलरी यांनी सांगितले की, अमेरिकी नागरिक समस्या सोडविणारे आहेत. ते पूल बांधतात. भिंती नव्हे. ट्रम्प यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. अमेरिकेला सुरक्षित करण्यावर ते सातत्याने बोलत असतात; पण पोलिसांना मदत करण्यासाठी एखादा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आहे का? (वृत्तसंस्था)
उपराष्ट्राध्यक्षपदासाठी हिलरींसोबत टीम केन
क्लिंटन यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून टिम केन यांची निवड केली आहे. सिनेटर असलेले केन हे व्हर्जिनिया प्रांताचे आहेत. हिलरी यांनी काल रात्री टिष्ट्वट करून कायने यांच्या नावाची घोषणा केली. ५८ वर्षीय केन हे व्हर्जिया प्रांताचे माजी गव्हर्नर आहेत. सिनेटच्या इंडिया कॉकसचे ते सदस्य आहेत. आॅक्टोबर २0१४ मध्ये अमेरिकी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी भारताला भेट दिली होती. हिलरी यांनी म्हटले की, केन यांनी जीवन लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लढण्यास अर्पण केले आहे. ते अमेरिकेच्या इतिहासातील उपाध्यक्षपदाचे चांगले उमेदवार आहेत.