उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:10 AM2019-07-01T05:10:58+5:302019-07-01T05:15:02+5:30

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प हे पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष

 Trump going to North Korea is the first US President | उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

Next

पानमुनजॉम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कोरियन उपखंडास विभागणाऱ्या निर्लष्करी पट्ट्यात जाऊन उत्तर कोरियाचे नेते किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन इतिहास घडविला. ही भेट केवळ प्रतीकात्मक होती तरी उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प हे पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असल्याने या भेटीला मोठे राजनैतिक महत्व होते.
सन १९५० ते ५३ अशी तब्बल चार वर्षे चाललेले कोरियन युद्ध, शांतता करार न होता शस्त्रसंधी होऊन जेथे थांबले त्या रेषेवर ट्रम्प व किम यांची ही भेट झाली. नंतर उत्तर कोरियाच्या हद्दीत काही पावले जाऊन ट्रम्प यांनी किम यांच्याशी हस्तांदोलन केले. पुन्हा मागे वळून दोन्ही नेते सीमारेषेवर थांबले. छायाचित्रे काढून झाल्यावर दोघेही दक्षिण कोरियाच्या हद्दीत काही पावले चालत गेले. तेथे ते दोघे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाये-इन यांना भेटले.
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांवरून प्योंग्यांग व वॉशिंग्टनमधील वाटाघाटी तिढा निर्माण होऊन बंद असताना ट्रम्प यांनी शनिवारी टिष्ट्वटरवरून दिलेल्या निमंत्रणानंतर ही ऐतिहासिक भेट झाली. भेटीनंतर ट्रम्प म्हणाले की, जगाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे व येथे येणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. खूप महान गोष्टी घडत आहेत. आजची ही घटना म्हणजे गेल्या वर्षी याच निर्लष्करी पट्ट्याच्या सीमारेषेवर किम व मून यांच्यात झालेल्या ऐतिहासिक भेटीचा पुढील अध्याय होता. अमेरिका व उत्तर कोरियातील तणाव संघर्षाच्या पातळीपर्यंत वाढल्यानंतर स्योल येथील हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धांचे निमित्त साधून मून यांनी या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यात पुढाकार घेतला होता.त्याच वेळी त्यांनी तिन्ही देशांच्या नेत्यांनी दोन्ही कोरियांच्या सीमेवरील ‘शस्त्रसंधीच्या गावात’ एकत्र भेटण्याची कल्पना मांडली होती. ‘जी-२०’ देशांच्या शिखर परिषदेहून जपानमधून ओसाका येथून स्योलला जाताना ट्रम्प यांनी या भेटीचा प्रस्ताव टिष्ट्वटरवर दिला होता. उत्तर कोरियानेही त्यात तात्काळ प्रतिसाद दिला आणि २४ तासांच्या आत या भेटीचा प्रसातव प्रत्यक्षात उतरला.
याआधी ट्रम्प व किम यांच्यात आधी सिंगापूर येथे व नंतर व्हिएतनाममध्ये दोन शिखर बैठका झाल्या होत्या. मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. पण या दोन्ही नेत्यांनी परस्परांशी पत्रव्यवहार सुरु ठेवला.

चर्चा पुन्हा सुरू होणार
सीमेवरील या भेटींनंतर ट्रम्प व किम यांची बंद दरवाज्याआड सुमारे एक तास बैठक झाली. नंतर ट्रम्प म्हणाले, आमची फारच उत्तम बैठक झाली. पुढे काय करता येईल, ते आम्ही पाहू. बंद पडलेली बोलणी पुन्हा सुरू करण्यासाठी दोन्ही देश आपापली प्रतिनिधीमंडळे नेमतील. माझ्याकडे वेळ भरपूर आहे. त्यामुळे लगेच तोडगा निघण्याची मला घाई नाही.

Web Title:  Trump going to North Korea is the first US President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.