ट्रम्प यांनी केला डबा उपडा, माशांसह ट्विटरला मिळालं खाद्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:04 PM2017-11-06T19:04:32+5:302017-11-06T19:05:42+5:30
टोकियो- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जपानच्या दौ-यावर आहेत. जपान दौ-यात ट्रम्प यांनी एक असा किस्सा केलाय की, त्यामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेत.
टोकियो- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जपानच्या दौ-यावर आहेत. जपान दौ-यात ट्रम्प यांनी एक असा किस्सा केलाय की, त्यामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेत. जपान दौ-यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अकासका पॅलेसमधील तलावाजवळ कोय प्रजातीच्या माशांना खाद्य देण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन व जपानचे पंतप्रधान शिंजो अबेसुद्धा होते.
ट्रम्प यांच्याकडे माशांना खाद्य देण्याचा डबा देण्यात आला, त्यावेळी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता पूर्ण डबा तलावात रिकामी केला. दुसरीकडे ट्रम्प माशांना खाद्य देण्यासाठी डबा आपल्याकडे देतील, या प्रतीक्षेत शिंजो अबे होते. या प्रकारानंतर मत्स्यजीव प्रेमींनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. माशांना एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्य दिलं जाऊ शकत नाही. कारण मासे एवढं खाद्य एकदम खाणार नाही. त्यांना थोड्या थोड्या वेळानं खाद्य दिलं पाहिजे, असंही अनेकांचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प माशांना द्यायच्या खाद्याचा डबा तलावात रिकामी करत असताना रेक्स टिलरसन यांना हसू आवरत नव्हते. या प्रकारानंतर डोनाल्ड ट्रम्पसुद्धा ट्विटर ट्रोल झाले आहेत.
काहींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन केलं, तर काही जणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना माशांना खाद्य भरवता येत नसल्याची टीका केली आहे. एका यूझर्सनंही ओबामा यांचा जुना व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवला आहे.
या दौ-यात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियावर निशाणा साधला आहे. कोणत्याही हुकूमशाहनं अमेरिकेला कमी समजू नये, असंही ट्रम्प म्हणाले. ते टोकियोमध्ये बोलत होते. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासह सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही कमी ठेवणार नाही. तसेच आम्ही कधीच हिंमत हरणार नाही, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.