अमेरिकेत ट्रम्प सरकार!

By Admin | Published: November 10, 2016 06:19 AM2016-11-10T06:19:58+5:302016-11-10T06:19:58+5:30

हिलरी क्लिंटन यांचा अनपेक्षित पराभव करून अमेरिका या बलाढ्य राष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्यांनी राजकीय पंडितांचे छातीठोकपणे वर्तविलेले अंदाज खोटे ठरविले.

Trump government in America! | अमेरिकेत ट्रम्प सरकार!

अमेरिकेत ट्रम्प सरकार!

googlenewsNext

डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुरब्बी राजकारणी हिलरी क्लिंटन यांचा अनपेक्षित पराभव करून अमेरिका या बलाढ्य राष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्यांनी राजकीय पंडितांचे छातीठोकपणे वर्तविलेले अंदाज खोटे ठरविले.

वाशिंग्टन : अत्यंत अटीतटीने आणि व्यक्तिगत त्वेषाने लढल्या गेलेल्या निवडणुकीत राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड जॉन ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुरब्बी राजकारणी हिलरी क्लिंटन यांचा अनपेक्षित पराभव करून अमेरिका या जगातील बलाढ्य राष्ट्राचे
४५ वे राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान पटकाविला.

७० वर्षांचे ट्रम्प हे पहिल्यांदाच निवडणूक लढवून राष्ट्राध्यक्ष होणारे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नेते असून पुढील चार वर्षे अमेरिकेची सत्तासूत्रे त्यांच्या हाती असतील. येत्या जानेवारीत मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून ट्रम्प औपचारिक सूत्रे स्वीकारतील.
ट्रम्प यांचा विजय एवढा अनपेक्षित होता की त्याने प्रसिद्धिमाध्यमे, जनमत चाचण्या घेणाऱ्या संस्था आणि मातब्बर राजकीय पंडितांचे छातीठोकपणे वर्तविलेले अंदाज सपशेल खोटे ठरविले. हिलरी क्लिंटन यांनी अपेक्षित विजय जल्लोषात साजरा करण्यासाठी ठरविलेली झोकदार पार्टी मतमोजणी पूर्ण होण्याआधीच रद्द केली. त्यांनी पराभव मान्य केला व ट्रम्प यांचे अभिनंदन केले. त्यांच्या मनाला लागलेली पराभवाची बोचणी एवढी नामुष्कीची होती की हिलरी बुधवारचा संपूर्ण दिवस लोकांसमोर किंवा टीव्ही कॅमेऱ्यापुढे आल्या नाहीत. ट्रम्प यांनी फोनवर हिलरी यांना ‘चुरशीची लढत’ दिल्याबद्दल धन्यवाद दिले व निवडणुकीत आलेली कटुता विसरून जाण्याची विनंती केली.
माझ्याविरुद्ध ज्यांनी निवडणूक लढविली ते माझे प्रतिस्पर्धी होते, पण त्यांच्या व्यक्तिगत क्षमतेबद्दल मला कधीच शंका नव्हती. पण ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायला मुळीच लायक नाहीत व त्यांच्याहाती सत्ता देणे देशाच्या हिताचे नाही, असे सांगून मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर व्यक्तिगत टिकास्त्र सोडले होते. परंतु तेच आता आपले उत्तराधिकारी होणार हे स्पष्ट झाल्यावर ओबामा यांनी ट्रम्प यांना फोन करून खुल्या दिलाने त्यांचे अभिनंदन केले आणि प्रस्तावित सत्तांतराविषयी आकणी करण्यासाठी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये भेटीसाठी येण्याचे त्यांना निमंत्रण दिले.
ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेचे सत्ताकेंद्र असलेले व्हाईट हाऊस आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात आले. राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसोबतच अमेरिकेन संसदेच्या सेनेट आणि ‘हाऊस आॅफ रिप्रेझेन्टेटिव्ह’ या दोन्ही सभागृहांच्याही निवडणुका झाल्या. त्यातही बाजी मारत रिपब्लिकन पक्षाने सेनटमधील आपले बहुमत कायम राखले व हाऊसमध्येही गेलेले बहुमत पुन्हा मिळाले. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातही बहुसंख्य न्यायाधीश पूर्वीच्या रिपब्लिकन प्रशासनानेच नेमलेले कायम आहेत. अशा प्रकारे राष्ट्राध्यक्षपद, संसद आणि सुप्रीम कोर्ट या तिन्ही सत्ताकेंद्रांचे नियंत्रण मिळवून रिपब्लिकन पक्षाने दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेच्या शासनयंत्रेणेवर एवढी बळकट पकड मिळविली. यामुळे अमेरिकेची ध्येयधोरणे कशी व किती बदलतात याकडे संपूर्ण जगाला औत्सुक्य असणे स्वाभाविक आहे.
उघडपणे उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे आणि आक्रस्ताळी व फटकळ स्वभावाचे ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार याने जगभरातील राजधान्यांमध्ये व अमेरिकेच्या मित्रदेशांमध्येही सावधपणाची तसेच काहीशी धास्तावलेली प्रतिक्रिया उमटली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी अपेक्षेप्रमाणे केलेले ट्रम्प यांचे केलेले दिलखुलास अभिनंदन सोडले तर इतर जागतिक नेत्यांच्या अभिनंदन संदेशात राजनैतिक औपचारिकतेचा भाग जास्त होता.अमेरिकेसह जगातील प्रमुख बाजारांमध्ये झालेली घसरणही ट्रम्प यांच्या विजयाबद्दल अंतस्थ नाराजी व्यक्त करणारी होती.
या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अमेरिकन समाजात पूर्वी कधीही नव्हती एवढी दरी आणि दुरावा निर्माण झाला होता. याचे स्वरूप वांशिक, आर्थिक, गरीब-श्रीमंत, मुळचे आणि बाहेरचे असे नानाविध होते. याची जाणीव ठेवून ट्रम्प यांनी विजयानंतर केलेल्या भाषणात, मी प्रत्येक अमेरिकन नागरिकाचा राष्ट्राध्यक्ष असेन व कोणाचीही मान मी खाली जाऊ देणार नाही, असे जाहीर केले. अमेरिकेला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणे व जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा देशाची उभारणी करणे, हे माझे मुख्य लक्ष्य असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमेरिका स्वत:चे हित नेहमीच सर्वोपरी मानेल, हे खरे असले तरी जगातील सर्व देशांसाठी आमच्या बरोबरीच्या मैत्रचा हात नेहमीच पुढे असेल, असेही त्यांनी सांगितले.

ही निवडणूक न जिंकल्याचे मला दु:ख आहे...
या निवडणुकीसाठी खूप मेहनत केली. हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. ही निवडणूक न जिंकल्याचे मला दु:ख आहे, असे हिलरी म्हणाल्या. पती बिल क्लिंटन, मुलगी चेल्सी, जावई मार्क यांच्यासह क्लिंटन आल्या होत्या. अतिशय भावनिक झालेल्या हिलरी यांना यावेळी अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांचे समर्थकही हातात हात देऊन, तर कुणी दुसऱ्याच्या खांद्यावर अश्रूंना वाट करून देत हिलरी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र दिसून आले.

मोदींनी ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा
भारत आणि अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण अतिशय आशावादी आहोत. अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन.
- नरेंद्र मोदी

एका अनिश्चिततेच्या कालावधीची
सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील निवडणुकीने या अनिश्चित कालावधीची सुरुवात केली आहे.
- फ्रान्स्वा ओलांद,
अध्यक्ष फ्रान्स

आम्ही चांगले सहकारी आहोत
ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंध कायम राहतील. उभय देशांतील संबंध स्वतंत्रता, लोकशाही आणि उद्योग यावर आधारित आहेत. व्यापार, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात आम्ही चांगले सहकारी आहोत आणि यापुढेही कायम राहू.
- तेरेसा मे, ब्रिटन

१८२०नंतर विदेशी वंशाची प्रथम अमेरिकी महिला
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यामुळे त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प प्रथम अमेरिकी महिला बनणार आहेत. मेलानिया यांच्या रूपाने दोन शतकांत प्रथमच परदेशी वंशाच्या महिलेला हा मान मिळत आहे. यापूर्वी १८२० मध्ये विदेशी वंशाच्या लुईसा अ‍ॅडम्स प्रथम महिला होत्या. ४६ वर्षांच्या मेलानिया स्लोवेनियन मॉडेल असून, त्यांचा जन्म १९७० मध्ये कम्युनिस्ट युगोस्लाव्हियात झाला होता. वाहन विक्रेते, तसेच स्लोव्हेनिया कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य व्हिक्टर क्नाव्स आणि अमालिजा यांची मेलानिया ही कन्या आहे.
लुईसा अमेरिकेचे सहावे राष्ट्राध्यक्ष जॉन क्विंसी (१८२५ ते १८२९) यांच्या पत्नी होत. लुईसा यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता. त्यांची आई इंग्रज व वडील अमेरिकन होते. लुईसा अमेरिकेबाहेर जन्मलेल्या पहिल्या प्रथम महिला होत्या.

‘ट्रम्प हा माझा
राष्ट्राध्यक्ष नाही’
ट्रम्प विजयी झाल्यानंतर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात निदर्शने करण्यात आली. काही निदर्शकांनी ‘हा माझा राष्ट्राध्यक्ष नाही’ अशा घोषणा दिल्या. निदर्शकांनी ओकलॅण्ड येथे गोळा होऊन फ्रीवे अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बे एरिया रॅपिड ट्रान्झिट भाग बंद करण्यास भाग पाडले. जवळपास २०० निदर्शक महामार्ग क्रमांक २० वर उतरले होते.


भारतावर काय होईल परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष होणार आहेत. भारतावर त्याचा काय परिणाम होईल ते काही मुद्द्यांवरून पाहता येईल.

एच१बी व्हिसा : विदेशी कर्मचाऱ्यांना देशात अस्थायी स्वरूपात काम करण्याची परवानगी देणारा हा व्हिसा आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, प्रतिभावान विदेशी नागरिकांना या देशात वास्तव्य करू देण्यासाठी आपणही आग्रही आहोत; पण त्यांनी येथे वैध मार्गानेच आले आणि राहिले पाहिजे; पण ट्रम्प यांच्या जाहीरनाम्यात असे स्पष्ट सांगितले होते की, अमेरिकी कंपन्यांना आदेश देण्यात येतील की, प्रतिभावान कर्मचाऱ्यांचा शोध त्यांनी देशाच्या आतच घ्यावा. एच १ बी व्हिसा ही अमेरिकन कंपन्यांची गरज नाही.

2016-17 साठी या व्हिसाची मर्यादा ६५००० आहे. प्रत्यक्षात २५०००० अर्ज भारतातील आयटीमधूनच आहेत.

पाकिस्तान
आणि काश्मीर
पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, असा उल्लेख ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेने भारतासोबत काम करायला हवे आणि पाकिस्तानला या माध्यमातून शह द्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. भारतातील शक्तिशाली सैन्याचाही त्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला होता. त्यामुळे पाकिस्तानपुरस्कृत काश्मिरातील दहशतवादाविरुद्ध आता अमेरिका भारतासोबत भक्कम उभी राहू शकते.

मेक इन इंडिया
अमेरिकन उत्पादन क्षेत्रात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ट्रम्प हे मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा आधार घेऊ पाहत आहेत. अर्थात अमेरिकन उद्योजकांसाठी ही निश्चितच गुड न्यूज नाही. २००० ते २०१४ या काळात अमेरिकन कंपन्यांतील ५० लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. १.२ कोटी अमेरिकन नागरिक विविध उद्योगव्यवसायात काम करत आहेत.

चीनचे नुकसान, भारताचा फायदा?
अमेरिका - चीनमधील व्यापाराचे संंतुलन करणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीरनाम्यात सांगितले होते. या माध्यमातून अमेरिकेतील लाखो रोजगार परत आणण्याचा संकल्प त्यांनी केला होता. चीनच्या वस्तूंवर कर लावण्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्या तुलनेत भारताला याचा फटका बसणार नाही.

Web Title: Trump government in America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.