ट्रम्प सरकारने मोडली इफ्तारची परंपरा; व्हाइट हाऊसवर नाही पार्टी

By admin | Published: June 26, 2017 02:17 PM2017-06-26T14:17:36+5:302017-06-26T15:12:51+5:30

यंदा व्हाइट हाऊसने रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं नाही.

Trump government breaks down the tradition of Ihtaar; No party at the White House | ट्रम्प सरकारने मोडली इफ्तारची परंपरा; व्हाइट हाऊसवर नाही पार्टी

ट्रम्प सरकारने मोडली इफ्तारची परंपरा; व्हाइट हाऊसवर नाही पार्टी

Next

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 26-  गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली परंपरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडली आहे. यंदा व्हाइट हाऊसने रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं नाही. विशेष म्हणजे रमजानच्या संपूर्ण महिन्यात ट्रम्प सरकारने एकदाही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं नाही. यापूर्वीच्या बिल क्लिंटन, जॉर्ज बूश आणि बराक ओबामा या सर्व राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात दरवर्षी इफ्तार पार्टीची परंपरा जोपासली गेली होती. पण यंदा मात्र पहिल्यांदाच व्हाइट हाऊसकडून ही परंपरा मोडली गेली आहे. 
याआधीच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसचे अधिकारी एक-दोन महिने आधीच इफ्तार पार्टीच्या आयोजनाची तयारी करत असायचे. पण यंदा त्यापैकी एकही गोष्ट तेथे बघायला मिळाली नाही. १८०५ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी व्हाइट हाऊसमध्ये पहिल्यांदा रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. पण खऱ्या अर्थाने १९९६ पासून दरवर्षी ही इफ्तार पार्टी  देण्याची परंपरा व्हाइट हाऊसने सुरू केली होती.  राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या काळात ही परंपरा सुरू झाली. 
यासंदर्भात शनिवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसकडून एक निवेदन जारी करण्यात आलं होतं.  "अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांनी जगातल्या अन्य भागात राहणाऱ्या मुस्लिमांप्रमाणे रमजानचा महिना आपल्या धर्माच्या शिकवणीनुसार पाळला तसंच शिकवणीनुसार दानधर्म केलं आणि रमजानचा महिना पाळला आहे. आता आपल्या कुटुंबियांसह ते ईद साजरी करतील. मुस्लिम बांधव आपले शेजारी आणि समाजातल्या इतर वर्गातल्या लोकांना अन्न वाटून घेण्याच्या आपल्या परंपरेचं पालनही करतील. यंदा ईदनिमित्त पुन्हा आम्ही दया, सहानुभूती आणि चांगल्या वागणुकीचं महत्त्व लक्षात ठेवू. अमेरिका या मूल्यांच्या सन्मानाशी वचनबद्ध आहे. ईद मुबारक", असं व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.  
सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी यावर्षी व्हाइट हाऊस इफ्तार पार्टीचं आयोजन होणार नाही, असं आधीच सांगितलं होतं. "ईद हा सण रमजानचा महिना संपल्यावर साजरा केला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात तसंच प्रार्थना आणि दानधर्मसुद्धा करतात. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना ईदनिमित्त ते संदेश जारी करायचे तो संदेश वेगळा असायचा. एकदा ओबामा यांच्या संदेशात अमेरिकी मुस्लिमांविरोधात वाढत्या हल्ल्यांबाबत दु:ख व्यक्त केलं गेलं होतं. अमेरिका निर्माणाच्या वेळी अमेरिकेतील मुस्लिम बांधव आपल्या परिवाराचा हिस्सा होते. असं ओबामा यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं होतं", असं सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी त्यांच्या निवेदनात म्हंटलं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन हे धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थक होते. डिसेंबर १८०५ मध्ये त्यांनी ट्युनिशियाच्या राजदूतांसाठी व्हाइट हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या वेळी अमेरिका आणि ट्युनिशियात संघर्ष सुरू होता, तरीही या तणावादरम्यान जेफरसन यांनी दिलेल्या  पार्टीचा उल्लेख आजही केला जातो.

Web Title: Trump government breaks down the tradition of Ihtaar; No party at the White House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.