ट्रम्प यांना श्रोत्यांनी भंडावून सोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2015 02:31 AM2015-12-23T02:31:03+5:302015-12-23T02:31:03+5:30
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी येथे झालेल्या रॅलीत लोकांनी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले
ग्रँड रॅपिडस : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी येथे झालेल्या रॅलीत लोकांनी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले. दहा वेळा त्यांच्या भाषणात अडथळे आणल्यानंतर गोंधळ करणाऱ्यांना डझनभर प्रेक्षकांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले तेव्हा पुढील भाषण सुरळीत पार पडले.
ट्रम्प यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले जात होते; पण लोक त्यांच्या बाजूच्या घोषणा देत पाठिंबा व्यक्त करीत होते. मिशिगन विद्यापीठाची तरुण विद्यार्थिनी मई इलताहिर ही केवळ रॅलीला विरोध करण्यासाठी आली होती. ती म्हणाली, ट्रम्प तुम्ही आमचे प्रतिनिधी असू शकत नाही. अमेरिकेत अनेक वंशाचे लोक राहतात. त्यांचे प्रतिनिधित्व तुम्ही करीत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त विधान केल्यापासून त्यांच्या प्रत्येक सभेला लोक गर्दी करीत आहेत. त्यांची लोकप्रियता बरीच वाढली आहे. तसेच विरोधी सूरही वाढत आहेत. सत्तेवर आलो तर अमेरिका - मेक्सिको सीमेवर भिंत बांधू असे त्यांनी अलीकडेच जाहीर केले आहे. (वृत्तसंस्था)
कॅलिफोर्निया पोलिसांनी विल्यम सेली या व्यक्तीला स्फोटके बनविण्याच्या आरोपावरून रविवारी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या घरी स्फोटके सापडली असून तो मुस्लिमांविरुद्ध ती वापरणार होता असा संशय आहे. त्याच्या घरी सापडलेली संशयित वस्तू निकामी करण्यात तज्ज्ञांना यश आले. ती स्फोटके जिवंत होती की नाही हे आताच सांगता येणार नाही.
स्थानिक दैनिकातील वृत्तानुसार विल्यम स्फोटाची धमकी देत होता. तो नियमितपणे फेसबुक वापरतो व तो रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठीराखा आहे. त्याने नियमित पोस्ट केलेल्या मजकुरात ट्रम्प यांची प्रशंसा तो करीत असे.