ट्रम्प-किम भेट; उत्तर कोरियाचे नेते सिंगापूरमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 12:11 PM2018-05-29T12:11:47+5:302018-05-29T12:17:13+5:30
किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत.
सिंगापूर- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 जून होणारी सिंगापूर भेट आता होण्याची चिन्हे दिसत आहे. उत्तर कोरियासंदर्भात काल डोनल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केल्यावर या भेटीची शक्यता अधिक ठळक झाली होती. त्याचबरोबर अमेरिकन शिष्टमंडळ प्योंगयांग येथे पोहोचले होते. आता किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत. याबाबत जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेने वृत्त प्रसारित केले आहे. किम चांग सन हे बीजिंगमार्गे सिंगापूरमध्ये सोमवारी रात्री दाखल झाले.
याबरोबरच अमेरिकन सरकारमधील अधिकारी, व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ फॉर ऑपरेशन्स जोए हॅगिनसुद्धा अमेरिकेच्या योकोटा एअरबेसवरुन सिंगापूरला पोहोचले आहेत.
गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांची भेट घेतली होती. त्यामुळे कोरियन द्वीपकल्पातून अण्वस्त्रे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी गेले होते. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते.
द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्च स्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला होताय उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश होता.