ट्रम्प-किम यांची भेट; कॅपेला हॉटेलची निवड का झाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 01:26 PM2018-06-06T13:26:16+5:302018-06-06T13:26:16+5:30
डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेट होणार आहे. सिंगापूरमधील सेंटोसा बेटावरील कॅपेला हॉटेल येथे हे दोन्ही नेते भेटून चर्चा करणार आहेत.
सिंगापूर- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेट होणार आहे. सिंगापूरमधील सेंटोसा बेटावरील कॅपेला हॉटेल येथे हे दोन्ही नेते भेटून चर्चा करणार आहेत. व्हाईट हाऊसने परवानगी दिल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इनसुद्धा या चर्चेसाठी सिंगापूरमध्ये येऊ शकतात. तसे झाल्यास तिन्ही देशांच्या नेत्यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याची अभूतपूर्व संधी मिळेल.
कॅपेला हॉटेलची निवड झाल्याबद्दलचे व्हाईटहाऊसच्या माध्यमसचिवा सारा सँडर्स यांनी केले
कॅपेला हॉटेलची वैशिष्ट्ये-
1) सिंगापूरच्या दक्षिणेस असणाऱ्या सेंटोसा बेटावर हे हॉटेल आहे. समुद्रकिनाऱ्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर कॅपेला हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये 112 खोल्या आणि सूटस आहेत. व्हाईट हाऊसने या हॉटेलची निवड केल्यावर तात्काळ या हॉटेलचे संकेतस्थळ कोलमडून पडले.
2) 2009 साली या हॉटेलचे उद्घाटन जाले. ब्रिटिश स्थापत्यविशारद नॉर्मन फॉस्टर यांनी या हॉटेलचे स्थापत्य पाहिले आहे. या हॉटेलमधील बैठक घेण्याच्या खोल्यांना जमिनीपासून छतापर्यंत मोठ्या खिडक्या आहेत त्यामुळे दक्षिण चिनी समुद्राचे दृश्यही त्यामधून उत्तमप्रकारे दिसते.
3) सेंटोसा बेट आणि सिंगापूरची मुख्यभूमी यांच्यापर्यंत एकच रस्ता आहे. तसेच हे बेट केबलकारनेही जोडलेले आहे. कॅपेला हे मुख्यभूमीपासून दूर असल्यामुळे सुरक्षाविषयक प्रश्न कमी होतील अशीही हे हॉटेल निवडण्यामागची शक्यता असेल.
4) सिंगापूरच्या पॉन्टीअॅक लँड समुहाकडे या हॉटेलची मालकी आहे.
5) आजवर कॅपेला हॉटेलमध्ये राजकीय बैठका झालेल्या नाहीत. शांग्री ला हॉटेलमध्येच आजवर मोठ्या राजकीय परिषदा झालेल्या आहेत. शांग्री ला हॉटेलमध्ये जॉर्ड बुश, बराक ओबामा चर्चेसाठी येऊन गेलेले आहेत.