जाताजाता ट्रम्प यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, "नशीबही बायडेन यांना साथ देवो हीच प्रार्थना"
By जयदीप दाभोळकर | Published: January 20, 2021 08:45 AM2021-01-20T08:45:52+5:302021-01-20T08:51:42+5:30
आज ट्रम्प यांचा कार्यकाळ होणार पूर्ण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज पूर्ण होणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरचं अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. तसंच जो बायडेन यांना शुभेच्छा देत यशासाठी नशीबही त्यांचं साथ देवो अशी प्रार्थना, असं म्हणत सूचक इशाराही दिला.
"संसंदेच्या परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर सर्वच जम भयभीत झाले होते. राजकीय हिंसाचार हा अमेरिकन नागरिकांच्या प्रत्येक बाबीवर होणारा हल्ला आहे. हे कधीही सहन केलं जाऊ शकत नाही," असं ट्रम्प म्हणाले. यादरम्यान त्यांनी विरोधकांना राजकीय द्वेषातून बाहेर येण्याचं आवाहनही केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान कोरोना विषाणूबाबतही भाष्य केलं. "चीन सोबत आपण नव्या रणनितीनुसार करार केले. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध झपाट्यानं बदलत होते. अमेरिकेतही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात होती. परंतु कोरोना विषाणूनं आम्हाला निराळ्या दिशेनं जाण्यास प्रवृत्त केलं," असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.
We imposed historic and monumental tariffs on China; made a great new deal with China... Our trade relationship was rapidly changing, billions and billions of dollars were pouring into the US, but the virus forced us to go in a different direction: US President Donald Trump https://t.co/aLjO1qG0FW
— ANI (@ANI) January 19, 2021
आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, की "आपण सर्वांनी अमेरिकेला पुन्हा महासत्ता बनवण्यासाठी एक अभियान सुरू केलं. आम्ही जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था उभारली." ज्यानं कोणतीही नवी लढाई सुरू केली नाही असा दशकांमधील पहिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा आपल्याला अभिमान असल्य़ाचंही ट्रम्प म्हणाले. "आम्ही नव्या प्रशासनाचं स्वागत करतो आणि अमेरिकेला सुरक्षित, समृद्ध ठेवण्यासाठीही प्रार्थना करतो," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी ट्रम्प यांनी फर्स्ट लेडी आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, तसंच ट्रम्प कुटुंबीयांचेही आभार मानले.