मुलीसाठी ट्रम्प यांनी पदाचा केला गैरवापर? टीकेचा भडिमार
By Admin | Published: February 9, 2017 03:13 PM2017-02-09T15:13:26+5:302017-02-09T15:37:53+5:30
मुलीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्डस्ट्रॉम या कंपनीविरोधात ट्वीट केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन , दि. 9 - अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आता नव्या वादात अडकले आहेत. त्यांच्या मुलीच्या फॅशन कंपनीचे कपडे आपल्या दुकानात विकायला विरोध करणा-या एका कंपनीविरोधात त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.
ट्रम्प यांनी नॉर्डस्ट्रॉम या कंपनीविरोधात ट्वीट केलं आहे. इवांकाला चुकीची वागणूक देण्यात आली. ती चांगली व्यक्ती आहे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी ती मला नेहमी प्रोत्साहन देत असते. जे झालं ते वाईट झालं. असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
त्यांच्या या ट्विटनंतर डेमोक्रेटिक पार्टीच्या एका सेनेटरने ट्रम्प यांनी राष्ट्रपती पदाचा अपमान केला असून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असं म्हटलं आहे. आपल्या कुटुंबियांच्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी ट्रम्प राष्ट्रपती पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
My daughter Ivanka has been treated so unfairly by @Nordstrom. She is a great person -- always pushing me to do the right thing! Terrible!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 8, 2017
डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या नॅन्सी पलोसी यांनीही ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्या मते हे अयोग्य आहे. पण राष्ट्रपती ट्रम्प हे देखील अयोग्य राष्ट्रपती आहेत . त्यांवा जे हवं तेच ते करतील असं त्या म्हणाल्या.
बराक ओबामा यांच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसमध्ये कार्यरत असलेले अधिकारी नॉर्म ईसन यांनी हा घृणास्पद प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा सल्ला त्यांनी दिली आहे.
नॉर्डस्ट्रॉम कंपनीने गेल्या आठवड्यात इवांका ट्रम्पच्या फॅशन कंपनीचे कपडे आपल्या दुकानात विकणार नसल्याची घोषणा केली होती. विक्री कमी झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीने स्पष्ट केलं होतं. विक्री आणि प्रदर्शनाच्या आधारे आम्ही निर्णय घेतो. इवांका ट्रम्पच्या फॅशन कंपनीचे कपडे न विकण्याचा निर्णय घेणारी नॉर्डस्ट्रॉम ही पाचवी कंपनी आहे.