उत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू- व्हाइट हाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 11:28 AM2017-08-01T11:28:44+5:302017-08-01T11:33:46+5:30
उत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचं व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे.
वॉशिंग्टन, दि. 1 - उत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचं व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे. उत्तर कोरियानं आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल(आयसीबीएम)ची चाचणी घेऊन आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आता अमेरिकेनंही उत्तर कोरियावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले आहेत. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पर्यायांना सार्वजनिक करणार नाही, असंही व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलं आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते सारा सेंडर्स यांनी एका संमेलनात याची माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष कोणत्याही पर्यायाला सार्वजनिक करणार नाहीत, मात्र सर्व पर्यायांवर विचार सुरू आहे.
तर पेंटागॉनच्या माहितीनुसार, अमेरिकेचा संरक्षण विभाग सहयोगी देशांचं संरक्षण करण्यास आणि उत्तर कोरियाशी कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्यासाठी तयार आहे. उत्तर कोरियानं आयसीबीएस या बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी गेतल्यानं काहीत तासांतच अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सेनेनं पाच संयुक्त सैन्य अभ्यास केला होता.
उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प म्हणाले होते, मी चीनमुळे खूप निराश आहे. आमच्या मागच्या नेत्यांनी त्यांना व्यापारात करोडो डॉलर कमावण्याची मोकळीक दिली होती. चीन उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर अमेरिकेसाठी काहीच करू शकत नाही. चीननं वार्तालापाशिवाय उत्तर कोरियाशी अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. चीन ही समस्या चुटकीसरशी सोडवू शकत होता. मात्र हे जास्त दिवस चालणार नाही, ही समस्या तात्काळ निकालात काढणार आहोत. अमेरिका सहयोगी देशांच्या संरक्षणाखातर शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला होता.
ट्विटवरून ट्रम्प यांचा मूड समजतो. उत्तर कोरियानं आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केल्याचं ऐकिवात आहे. उत्तर कोरियानं न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचा दावाही केला आहे. ट्रम्प यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट ठरतेय. ज्यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे, असं ग्लोबल टाइम्समधून छापून आलं आहे. उत्तर कोरियावर कोळसा आयात करण्यात बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या प्रतिबंधामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. स्वतःच्या शेजारील देशांची व्यापार करताना चीनला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. चीन उत्तर कोरियाची समस्या चुटकीसरशी सोडवू शकतो, ट्रम्प यांचं हे विधान फक्त अनुभव नसलेला राष्ट्राध्यक्षच देऊ शकतो. ज्यांना उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत फार काही माहिती नाही, असंही ग्लोबल टाइम्समधून छापून आले होते.