US Election 2020 : ट्रम्प की बायडन? कोण होणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष? 'यांना' आहे सट्टेबाजांची सर्वाधिक पसंती
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 3, 2020 02:03 PM2020-11-03T14:03:13+5:302020-11-03T14:03:27+5:30
US Election Result 2020: या निवडणुकीसाठी जवळपास 1 अब्ज डॉलरचा (जवळपास 7450 कोटी रुपये) सट्टा लागला आहे. हे प्रमाण 2016च्या निवडणुकीचा विचार करता दुप्पट आहे. (Trump, Biden)
वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसंदर्भात जगभरातील सट्टेबाजांमध्येही उत्साह आहे. एका वृत्तानुसार, या निवडणुकीसाठी जवळपास 1 अब्ज डॉलरचा (जवळपास 7450 कोटी रुपये) सट्टा लागला आहे. हे प्रमाण 2016च्या निवडणुकीचा विचार करता दुप्पट आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर अधिक लोक डाव लावत आहेत. ते सट्टेबाजांचे फेव्हरिट आहेत. अर्थात बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील, असे अधिकांश सट्टेबाजांना वाटते.
आज निवडणूक - ( US Election 2020 )
खरे तर ट्रम्प आणि बायडन सामना हा अत्यंत चुरशीचा आहे. अमेरिकेत आज मतदान होत आहे. या निवडणुकीतील हे अखेरचे मतदान असेल. या निवडणुकीत एकीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन हे आहेत. सट्टेबाज ज्यो बायडन यांच्या विजयावर अधिक सट्टा लावत आहेत. इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा जगातला सर्वात मोठा सट्टा असू शकतो.
विक्रमी सट्टेबाजी -
मतदानाला सुरुवात होईपर्यंत सट्टेबाजीची रक्कम 1.3 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जगभरात सर्वाधिक सट्टा फुटबॉलच्या सामन्यांवरच लागला होता. मात्र, यावेळची अमेरिन निवडणूक हा रोकॉर्ड मोडीत काढू शकते. अमेरिकेबरोबरच इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडा सारख्या अनेक देशांतून अनेक वेबसाइट्सच्या सहाय्यानेही लोक अमेरिकेतील निवडणुकीसाठी सट्टा लावत आहेत.
कुणाच्या विजयावर अधिक बोली -
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडची वेबसाइट PredictItवरून बायडन यांच्यावर 68 सेंट तर ट्रम्प यांच्यावर केवळ 39 सेंटचाच डाव लागला आहे. इंग्लंडमधील कंपनी Betfair एक्सचेन्जवरही सुरू असलेल्या सट्टेबाजीनुसार, बायडन यांच्या विजयाची शक्यता 65 टक्के तर ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता केवळ 35 टक्केच असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, BC bettors नावाच्या साइटवर 44 टक्के लोक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा विजयी होतील, यावर डाव लावत आहेत. तर 27 टक्के लोक बायडन हे विजयी होतील, असे म्हणत आहेत.
कितपत विश्वासार्ह -
अमेरिकेत या सट्टेबाजांची बोली म्हणजे मोठा संकेत मानला जातो. तेथील गत 50 वर्षांच्या सट्टेबाजीच्या इतिहासात सट्टेबाजांनी जे उमेदवार निवडून येतील, असे सांगितले, त्यांपैकी प्रत्येक चारमधून तीन जणांचा विजय झाला आहे. अर्थात या सट्टेबाजांचा डाव 75 टक्के खरा ठरला आहे.
कोण आहेत ज्यो बायडन?
ज्यो बायडन डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवारी आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना बायडन उपाध्यक्ष होते. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते सध्या ७७ वर्षांचे आहेत.