भविष्य नाकारणाऱ्या राष्ट्रांत ट्रम्प सहभागी
By admin | Published: June 3, 2017 01:27 AM2017-06-03T01:27:33+5:302017-06-03T01:27:33+5:30
अमेरिकेचे जागतिक नेतृत्व बाजूला सारून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भविष्य नाकारणाऱ्या मूठभर राष्ट्रंत सहभागी झाले आहेत, अशा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे जागतिक नेतृत्व बाजूला सारून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भविष्य नाकारणाऱ्या मूठभर राष्ट्रंत सहभागी झाले आहेत, अशा शब्दात माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हवामान बदलाच्या पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
ओबामा म्हणाले की, जे राष्ट्र पॅरिस कराराशी जोडले गेलेले आहेत त्यांना नोकऱ्या आणि उद्योगात लाभ होणार आहे. मला वाटते की, अमेरिकेने या करारात सर्वांत पुढे असायला हवे. दीड वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये जगातील देश एक आले. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जगाच्या संरक्षणासाठी एक करार करण्यात आला. ओबामा यांनी थेट ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की, वैज्ञानिक, इंजिनिअरिंग यांच्यासाठी पॅरिस कराराने संधीचे दरवाजे खुले केले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की, अमेरिका हवामान बदलाच्या पॅरिस करारातून बाहेर पडत आहे. अमेरिकेसाठी हा योग्य निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसचे माजी संपर्क संचालक जेन साकी यांनी हा निर्णय विनाशक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आम्ही वचन दिले होते. जगातील प्रत्येक दुसरे सरकार या कराराच्या मागे खंबीरपणे उभे होते. व्यावसायिक आणि नागरिकांत हा करार लोकप्रिय होता. आमच्या पुढच्या पिढीसाठी त्यामुळे भविष्य निश्चित झाले होते. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्या एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत १२ टक्के वेगाने वाढत आहेत. उर्वरित जगात आमच्या संबंधासाठी हा निर्णय चुकीचा आहे. (वृत्तसंस्था)
ट्रम्प म्हणाले, कराराचा लाभ भारताला
१९० पेक्षा अधिक देश सहभागी असलेल्या या कराराचा अधिकाधिक लाभ भारत आणि चीनला होत आहे, असे मत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, अमेरिकेच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग आणि रोजगारावर याचा वाईट परिणाम झाला आहे. या करारामुळे भारताला अब्जावधी डॉलर मिळणार आहेत.
भारताला पर्यावरण संरक्षणाची पाच हजार वर्षांची परंपरा : मोदी
सेंट पिटर्सबर्ग (रशिया) : भारताला पर्यावरण संरक्षणाची पाच हजार वर्षांची परंपरा आहे, असे सांगतानाच पर्यावरण संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पॅरिस करारातून माघार घेणाऱ्या अमेरिकेचा थेट संदर्भ टाळून मोदी म्हणाले की, पर्यावरणाबाबतची आमची बांधिलकी भविष्यातील पिढ्यांसाठी फायदेशीर आहे. त्याआधीच्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, निसर्गाचे शोषण आम्हाला मान्य नाही.