Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:17 AM2020-05-08T09:17:36+5:302020-05-08T09:25:41+5:30
व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे.
वॉशिंग्टनः जगभरात कोरोनानं थैमान घातलेला असून, अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित आणि मृतांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत पसरलेला हा कोरोना व्हाइट हाऊसमध्ये जाऊन पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी नोकराला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यासंदर्भात व्हाइट हाऊसनं एक निवेदनही प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या नौदलातील ही व्यक्ती असून, ती राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सेवेत तैनात होती. खबरदारी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे. आजपासून मी रोज कोरोना चाचणी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प कुटुंबात वैयक्तिक नोकर म्हणून काम करणाऱ्या अमेरिकन सैन्यातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचीही चाचणी घेण्यात आली असून दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असंही व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली व्यक्ती ही सैन्याच्या एका एलिट युनिटचा भाग आहे, जी राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाची सेवा करते. असे नोकर बहुतेक वेळा राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या अगदी जवळ काम करतात.
व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. ही व्यक्ती कोठून संक्रमित झाली हेही तपासले जात आहे. संसर्ग झालेली व्यक्ती राष्ट्रपतींच्या वैयक्तिक कामात मदत करत होती. राष्ट्रपतींच्या अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. ते बहुतेक वेळा त्यांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्षांसोबत असतात. या व्यक्तीमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाची लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. तेव्हा तिला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार
'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'
Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार