अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब
By जयदीप दाभोळकर | Updated: January 7, 2021 16:34 IST2021-01-07T16:31:06+5:302021-01-07T16:34:15+5:30
या घोषणेपूर्वी सकाळी ट्रम्प समर्थकांकडून संसेदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार

अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब
अमेरिकन काँग्रेसनं डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. एकीकडे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. जो बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मतं मिळाली. तसंच २० जानेवारी रोजी आपण सत्तेचं हस्तांतरण करणार असल्याचंही ट्रम्प यांनी गुरूवारी सांगितलं.
अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्रात औपचारिक पद्धतीनं राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयानंतर काही वेळानं आपण शांततेत सत्तेचं हस्तांतरण करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. "या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या उत्तम कार्यकाळाचा शेवट झाला आहे. अमेरिकेला पुन्हा मोठं करण्यासाठी आमच्यासाठी ही संघर्षाची सुरूवात आहे," असंही ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं वक्तव्य केलं.
Congress accepts Electoral College result, which clears the way for Joe Biden (in file photo) to become president of the United States: Reuters pic.twitter.com/ZkppTthSbr
— ANI (@ANI) January 7, 2021
जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी पार पडणार आहे. परंतु कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत साधेपणानं पार पडणार आहे. अमेरिकनं संसदेच्या संयुक्त सत्रात गुरूवारी औपचारिक रित्या बायडेन यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. यापूर्वी कॅपिटल बिल्डींगमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार घडवला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाले होते तर चार जणांचा मृत्यूही झाला होता. हिंसाचारानंतर खासदारांना सुरक्षित स्थानी नेण्यात आलं. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. बायडेन आणि हॅरिस यांना ३०६ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली होती.