डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोदींचं कौतुक; तुमच्यासोबत असणारे पत्रकार माझ्याकडे असते तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:58 PM2019-09-25T12:58:31+5:302019-09-25T12:59:39+5:30
मी आत्तापर्यंत ज्यांना ऐकलं त्यांच्यापेक्षा हे भारी आहेत. तुम्हाला हे पत्रकार कुठे भेटले, ही मोठी गोष्ट आहे असं बोलल्यावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना हसू आवरलं नाही.
न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या पत्रकारांची खिल्ली उडविली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांवर पुन्हा भाष्य केलं.
मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी मोदींकडे इशारा करत ट्रम्प म्हणाले की, तुमचे पत्रकार शानदार आहेत. माझ्याकडे असे पत्रकार असायला हवे होते. मी आत्तापर्यंत ज्यांना ऐकलं त्यांच्यापेक्षा हे भारी आहेत. तुम्हाला हे पत्रकार कुठे भेटले, ही मोठी गोष्ट आहे असं बोलल्यावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना हसू आवरलं नाही.
सोमवारी इम्रान खान आणि ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकार भारत आणि काश्मीरबाबत वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारत होते. यावरुन चिडलेल्या ट्रम्प यांनी पाकिस्तानला टोला लगावत इम्रान खान यांना विचारलं की, तुम्ही अशा पत्रकारांना कुठून घेऊन येता? पाकिस्तानी पत्रकार काश्मीर मुद्द्यावरुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत होते. त्यावरुन ट्रम्प यांनी त्यांची खिल्ली उडविली. पाकिस्तानचे पत्रकार ट्रम्प यांना काश्मीरमध्ये गेल्या 50 दिवसांपासून इंटरनेट सेवा, अन्न पुरवठा बंद आहे त्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विचारलं तुम्ही पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य आहात का? तुम्ही जो विचार करत आहात तेच बोलताय. तुमचा हा प्रश्न नाही तर वक्तव्य आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे बघत तुम्ही अशा रिपोर्टरना कुठून आणता? असा सवाल केल्याने इम्रान खान यांचीही गोची झाली होती.
यावेळी पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक करत त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हटलं. त्यांनी मोदींची तुलना अमेरिकन गायक आणि अभिनेते एल्विस प्रेस्लीसोबत केली. मोदी भारतात एल्विस प्रेस्लीसारखे लोकप्रिय आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी दहशतवादाबद्दल घेतलेल्या भूमिकेचीही ट्रम्प यांनी प्रशंसा केली. दहशतवादाबद्दलची मोदींची भूमिका अतिशय कठोर होती आणि त्यांनी ती अतिशय स्पष्टपणे मांडली, असं ट्रम्प म्हणाले.