‘दुसऱ्यांदा विजयासाठी ट्रम्प यांनी मागितली जिनपिंग यांची मदत’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:24 AM2020-06-19T00:24:36+5:302020-06-19T00:24:58+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदा होत असलेली राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी मागील वर्षी जपानमध्ये झालेल्या जी-२० शिखर संमेलनात आपले समपदस्थ शी जिनपिंग यांच्याकडे मदत मागितली होती, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
बोल्टन यांनी आपल्या नव्या पुस्तकात गोपनीय माहिती जगजाहीर केली आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले असून, विधि खात्याकडून या पुस्तकाच्या प्रकाशनावर अस्थायी रोख लावावी, अशी मागणीही केली आहे. ‘द रूम व्हेअर इट हॅपण्ड : अ व्हाईट हाऊस मेमोअर’ असे या पुस्तकाचे नाव असून, त्यातील काही भाग अमेरिकेतील वृत्तपत्रांत प्रकाशित झाले आहेत.
२३ जूनपासून हे पुस्तक दुकानांत उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी ट्रम्प यांनी बोल्टन यांना पदावरून बरखास्त केले होते, हे विशेष.
ट्रम्प यांनी बुधवारी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे की, ते खोटारडे आहेत. व्हाईट हाऊसमधील प्रत्येक जण त्यांचा द्वेष करतो. त्यांनी अत्यंत गोपनीय माहिती उघड केली आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे परवानगीही नाही.
बोल्टन यांनी आपल्या पुस्तकात अनेक बाबींचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिनपिंग यांनी मागील वर्षी ट्रम्प यांना सांगितले होते की, चीन उईगर मुस्लिमांना मोठ्या संख्येने नजरबंद करण्यासाठी तळ उभारत आहे. तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की, तुम्ही असे करायलाच हवे होते.
चीनविरुद्धची ट्रम्प यांची कठोर भूमिका किती काळापर्यंत टिकेल, याबाबतही बोल्टन यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांचे अध्यक्षपद रणनीती, धोरण यावर आधारित नाही, तर केवळ ट्रम्प यांच्यावर आधारित आहे. त्यामुळे ट्रम्प दुसºया कार्यकाळात काय करतील, याचा आताच विचार करणे गरजेचे आहे. ट्रम्प यांनी २९ जून २०१९ रोजी जपानच्या ओसाकामधील जी-२० शिखर संमेलनात जिनपिंग यांनी भेट घेतली होती.
त्यावेळी जिनपिंग म्हणाले होते की, अमेरिका-चीनचे संबंध जगात सर्वांत महत्त्वाचे आहेत. काही अमेरिकी नेते चीनसमवेत नव्या शीतयुद्धाचा उल्लेख करून चुकीच्या टिप्पणी करीत आहेत. जिनपिंग यांचा इशारा डेमोक्रॅटसकडे होता की, आणखी कुणाकडे होता, हे मला माहीत नव्हते; परंतु ट्रम्प यांनी हे ताबडतोब ओळखले. ते म्हणाले की, डेमोक्रॅटसमध्ये चीनबाबत शत्रुत्वाची भावना आहे. चर्चा अचानक आगामी निवडणुकीच्या मुद्याकडे वळली.
जो बिडेन यांचे टीकास्त्र
जॉन बोल्टन यांच्या पुस्तकातील काही अंश प्रकाशित होताच अमेरिकेतील राष्टÑाध्यक्षपदाचे डेमोक्रेटिक पार्टीचे संभाव्य उमेदवार जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी आपल्या राजकीय भविष्याचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेच्या लोकांना विकल्याचे बोल्टन यांच्या पुस्तकातून कळाले. त्यांनी दुसºयांदा जिंकण्यासाठी चीनच्या नेत्याकडे मदत मागितली आहे.