ट्रम्प, टेरीफ आणि सोने...! जाणून घ्या, भारतात या वर्षात किती प्रमाणात वाढू शकतात सोन्याचे दर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:27 IST2025-03-16T13:27:08+5:302025-03-16T13:27:53+5:30
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले त्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला. या पहिल्याच महिन्यात त्यांनी ६४ कार्यकारी आदेश काढून अमेरिकेचे अंतर्गत आणि जागतिक अर्थकारण ढवळून काढले. ट्रम्प व्यापार नीतीचा जागतिक अर्थकारणावर पडलेला एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे गेल्या एक महिन्यात सोन्याच्या वाढलेल्या किमती. या अनपेक्षित वाढीमुळे जगभरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ट्रम्प, टेरीफ आणि सोने...! जाणून घ्या, भारतात या वर्षात किती प्रमाणात वाढू शकतात सोन्याचे दर?
डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक -
ल्या तीन दशकांतील घडामोडी पाहिल्यास असे दिसते की ज्या-ज्या वेळी जागतिक व्यापार बाधित होतो त्या-त्यावेळी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. असाच प्रवाह जागतिक आर्थिक संकटांच्या काळात किंवा आर्थिक मंदीच्या काळात पाहायला मिळाला आहे. २००८ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात सोन्यामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणाम होणार आहे. व्यापार मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढत आहे. वस्तुतः कोरोनानंतरच्या काळामध्ये सोन्याच्या किमतींमध्ये तेजीची लाट पाहायला मिळाली आहे. याचे एक कारण म्हणजे अनेक राष्ट्रांच्या आणि व्यक्तींच्या सोन्यामधील गुंतवणुकींमध्ये लक्षणीय वाढ होत गेली. कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाउनमुळे जागतिक व्यापाराची प्रक्रिया प्रचंड विस्कळीत झाली.
जागतिक बाजारात सोन्याच्या भाव आज ३००० डॉलर प्रति औंस झाला आहे. हाच भाव जानेवारी २०२४ मध्ये २०४५ डॉलर एवढा होता. भारतात ९१ हजार रुपये प्रतितोळा इतकी सोन्याच्या भावाने मजल मारली आहे. एका वर्षातच २४ टक्क्यांनी सोन्याचे भाव वाढले आहेत. सध्याच्या सोन्याच्या भावातील भरारीचा आढावा घेतला असता जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत जागतिक बाजारपेठेमध्ये या मौल्यवान धातूच्या भावामध्ये ४२ टक्क्यांची वाढ झालेली आहे. या आश्चर्यजनक दरवाढीमुळे संपूर्ण जगाला बुचकळ्यात टाकले आहे.
का करत आहेत राष्ट्रे सोने खरेदी ?
गेल्या एका वर्षात राष्ट्रांकडून सोन्याचा साठा करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. राष्ट्रांच्या परकीय चलन साठ्यात (फॉरेक्स) सोन्याचे प्रमाण साधरणतः ७% असायचे ते आता वाढून १२ % पर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षभरात ५० हून अधिक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदीचा अक्षरशः सपाटाच लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात ५५ देशांच्या बँकांनी १,००० टन सोन्याची खरेदी केली आहे. भारताचेच उदाहरण घेतल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या एक वर्षांच्या काळात ९५ टन सोन्याची खरेदी केली आहे. चीनचा विचार केल्यास ३२५ टन सोन्याची खरेदी चिनी मध्यवर्ती बँकेने केली आहे. १९७० पर्यंत राष्ट्रांच्या फॉरेक्समधील सोन्याचा साठा हा ४० टक्के असायचा. नंतरच्या काळात तो कमी कमी होत गेला. साधारणतः दीड-दोन वर्षांपूर्वीपर्यंत विदेशी गंगाजळीतील सोन्याच्या साठ्याची जागतिक सरासरी ही ७ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. पण आज हे प्रमाण १२ टक्क्यांवर पोहोचले आहे. भारताचेच उदाहरण घेतल्यास आपली विदेशी गंगाजळी सुमारे ६०० अब्ज डॉलर इतकी असून यामध्ये ६५ टक्के हिस्सा डॉलरचा आहे आणि उर्वरित साठा सोन्याचा आहे.
‘रिसिप्रोकल टेरीफ’चे धोरण व सोने
ट्रम्प यांच्याकडून एप्रिल महिन्यापासून रिसिप्रोकल टेरीफच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यामध्ये अमेरिकेमध्ये विविध राष्ट्रांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
आयात शुल्कात वाढ झाल्यास त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम व्यापारावर होणार आहे. याचाच अर्थ अमेरिकेला निर्यात करणारे जे निर्यातदार देश आहेत त्यांच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. अशा स्थितीत सोन्यामधील गुंतवणुकीकडे कल अधिक वाढतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या टेरीफ कार्डचा फटका बसून सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सोने आणि डॉलरचा संबंध काय?
अमेरिकेचा जागतिक व्यापारातील वाटा हा केवळ ११% आहे. मात्र, जागतिक अर्थकारणात अमेरिकन डॉलरचा दबदबा आहे. आजही परकीय व्यापारासाठी प्रामुख्याने डॉलरचा वापर होतो. राष्ट्रांच्या परकीय चलन साठ्यात डॉलरचे प्रमाण आजही ६५% हून अधिक आहे. डॉलरचे मूल्य वधारणे किंवा कमी होणे याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असतो.
सोन्याच्या भावातील ताज्या वृद्धीमागे डॉलरच्या अर्थकारणाचाही प्रभाव दिसून येतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची किंमत आणि त्याची पत ही अमेरिकेच्या राजकीय आणि लष्करी सामर्थ्याशी निगडित आहे. डॉलर जितका मजबूत, तितकी अमेरिका मजबूत असे समीकरण आहे.
अमेरिकेचा जागतिक राजकारणातील हस्तक्षेप आणि प्रभाव जसजसा वाढत गेला तसतसा डॉलर प्रभावी ठरत गेला. आज डॉलर हा ‘ओव्हरप्राइस’ झालेला आहे. गेल्या २५ वर्षांत डॉलर निर्देशांक सर्वोच्च पातळीवर आहे. म्हणजेच एका मर्यादेपेक्षा किंवा अन्य जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरचे भाव कमालीचे वधारले आहेत. अमेरिकेच्या व्यापारावर, उद्योगधंद्यांवर, निर्यातीवर डॉलरच्या वाढलेल्या भावांचा नकारात्मक परिणाम होतो. थोडक्यात अमेरिकन वस्तू महाग बनतात. यामुळे अमेरिकन उद्योगांच्या उत्पादन व्यवस्थेला फटका बसू लागतो.
ट्रम्प यांच्याकडून डॉलरचे भाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी येणाऱ्या काळात डॉलरच्या भावात घसरण दिसून येऊ शकते. तसे झाल्यास डॉलरच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राष्ट्रांची अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढू शकते. यामध्ये सोने हा प्रमुख पर्याय ठरतो. परिणामी, येणाऱ्या काळात डॉलर कमकुवत होऊन सोन्यात आणखी तेजी दिसून येऊ शकते.
सोन्याच्या किमती आणखी वाढतील?
वाढती असुरक्षितता ही सोन्याला नित्यनवी झळाळी देत आहे. या असुरक्षिततेमुळे राष्ट्रेच नव्हे तर लोकांकडूनही सोन्यात मोठी गुंतवणूक केली जात आहे. अर्थशास्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूची मागणी वाढली की तिचे भाव वधारतात. त्यामुळे येणारा भविष्यकाळ हा सोन्याची ‘चमक’ वाढविणारा ठरणार असे दिसते.
भारतात सोन्याचे दर यंदा किती प्रमाणात वाढू शकतील?
पुढील महिन्यात जेव्हा ट्रम्प यांची टेरिफविषयक धोरणे अंमलात येतील आणि त्याचा जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणाम दिसू लागेल तेव्हा सोने नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचू शकते. भारतीय बाजारात दि. १ जानेवारी ते १३ मार्च या ५४ दिवसांच्या कालावधीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. टक्केवारीत पाहता, ही वाढ सुमारे १३ टक्के आहे. आता, सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श करण्यासाठी फक्त १४ टक्के वाढ होण्याची गरज आहे. सद्य:स्थिती पाहता, या वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत सहजपणे एक लाख रुपयांवर गेल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.