ट्रम्प यांची विरोधकांना धमकी; महाभियोग आणल्यास अमेरिका भिकेला लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 09:12 PM2018-08-23T21:12:30+5:302018-08-23T21:15:45+5:30
ट्रम्प यांनी पॉर्नस्टारला पैसे दिल्याचे आरोप मान्य केले; पण अभियानाचे पैसे वापरल्याचा केला इन्कार
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर महाभियोग आणण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना धमकी दिली आहे. आपल्यावर महाभियोग आणून पदावरून हटविल्यास देशात भुकंप होईल आणि बाजार तोंडघशी पडेल. यामुळे प्रत्येक अमेरिकी नागरिक गरीब होईल. यामुळे ही कृती करण्य़ाआधी विचार करा, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.
ट्रम्प यांच्यावर एक दिवसापूर्वीच त्यांच्याकडचे काम सोडलेला वकील माइकल कोहेने ने एका पॉर्नस्टार आणि प्लेबॉय मॅगझीनला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिले होते. तसेच ट्रम्प यांनी अमेरिकेचा कायदा मोडल्याचा आरोप केला होता. यावर खुलासा करताना ट्रम्प यांनी फॉक्स न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये वरील धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी कोहेने याचे आरोप कबुल केले आहेत. हे पैसे आपण आपल्या खिशातून दिले होते. ते कोणत्याही सरकारी निधी किंवा योजनेतून दिले नव्हते. यामुळे आपण कोणताही कायदा मोडलेला नाही. मी राष्ट्रपती बनल्यावर देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. आर्थिक क्षेत्रानेही मोठी झेप घेतली. हिलरी क्लिंटन जर निवडणूक जिंकली असती तर देशाची हालत खराब झाली असती.
ट्रम्प यांचे निवडणूक अभियानाचे अध्यक्ष पॉल मॅनफोर्ट यांना व्हर्जिनियाच्या न्यायालयाने आर्थिक अफरातफरीत दोषी करार दिला होता. मॅनफोर्ट यांच्यावर कर्ज उचलण्य़ासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमुळे ट्रम्प बॅकफुटवर आले आहेत. मात्र, कोहेनने केलेले आरोप सिद्ध होऊ शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, डेमोक्रेटीक पक्ष मध्यावधी निवडणुकांमध्ये या आरोपांचा फायदा उठवू शकते.