महिलांविषयीच्या विधानांनी ट्रम्प अडचणीत
By admin | Published: October 9, 2016 12:23 AM2016-10-09T00:23:20+5:302016-10-09T00:23:20+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे २00५ मधील आपल्याच एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. या व्हिडिओबद्दल
वॉशिंगटन : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे २00५ मधील आपल्याच एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. या व्हिडिओबद्दल त्यांना जाहीर माफीही मागावी लागली आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या हाती हा व्हिडिओ लागल्यानंतर व्हायरल झाला. त्यात ट्रम्प महिलांविषयी म्हणतात की, ‘मी त्यांचे थेट चुंबन घ्यायला सुरुवात करतो. फक्त चुंबन. मी अधिक वाट पाहू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्टार असता, तेव्हा त्या तुम्हाला हवे ते करू देतात.’
७0 वर्षीय ट्रम्प यांचा हा व्हिडीओ बिली बुश यांच्याशी बोलतानाचा आहे. ‘डेज आॅफ अवर लाइव्ज’ या शोमध्ये टीव्ही पाहुणे कलाकार म्हणून ट्रम्प यांच्याशी ही बातचीत करण्यात आली होती.
या व्हिडीओमुळे अमेरिकेत हलकल्लोळ उडाला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी तातडीने माफीचे निवेदन जारी केले. त्यांनी म्हटले की, हे बंद दाराआड झालेले खाजगी संभाषण आहे. बिल क्लिंटन यांनी यापेक्षा फार वाईट शब्द वापरले आहेत. तेही उघडपणे. यामुळे कोणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. (वृत्तसंस्था)
1ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी आणि डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी लगेच टीकेची झोड उठविणारे निवेदन केले. त्या म्हणाल्या की, ‘हे खरोखरच भयंकर आहे. आम्ही अशा माणसाला राष्ट्राध्यक्ष होण्याची परवानगी देऊ शकत नाही.’ डेमॉक्रॅटिक पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार टीम केन यांनी म्हटले की, अशा प्रकारचे वर्तन घाणेरडे आहे.
2नंतर ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवर दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ लोड करण्यात आला. त्यात ते म्हणतात की, मी सर्वगुणसंपन्न आहे, असा दावा मी कधीच केला नाही. हा व्हिडीओ दशकभरापूर्वीचा आहे.
मी त्याबद्दल माफी मागतो. अमेरिकेपुढील समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असे व्हिडीओ उकरून काढले जात आहेत. आमच्या नोकऱ्या हातून निघून चालल्या आहेत. आम्ही असुरक्षित झालो आहोत. वॉशिंगटन तर कोलमडून पडले आहे. बिल क्लिंटन यांनी यापेक्षा भयंकर कृत्ये केली आहेत. त्यांनी महिलांना अवमानित केले. त्यांचे शोषण केले. त्यांना धमकावले. येणाऱ्या रविवारच्या चर्चेत हे सगळे समोर येईलच, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.