ट्रम्प काही ऐकेनात, जगाची मदत रोखली; ६० अब्ज डाॅलरची मदत बंद करणार; ‘यूएसएड’च्या ९०% करारांना कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:37 IST2025-02-28T04:37:06+5:302025-02-28T04:37:26+5:30
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे ‘यूएसएड’ने ९० टक्के करारांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधीचा आराखडा सादर केला आहे.

ट्रम्प काही ऐकेनात, जगाची मदत रोखली; ६० अब्ज डाॅलरची मदत बंद करणार; ‘यूएसएड’च्या ९०% करारांना कात्री
वाॅशिंग्टन : ‘यूएसएड’ अर्थात युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांना अमेरिकेतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधीचे ९० टक्के करार संपुष्टात येतील. या माध्यमातून जगभरात दिल्या जाणाऱ्या ६० अब्ज डॉलरची मदत बंद केली जात आहे. यानंतर अगदी मोजक्या योजनाच सुरू राहतील.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे ‘यूएसएड’ने ९० टक्के करारांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधीचा आराखडा सादर केला आहे.
न्यायालयाचा हस्तक्षेप
‘यूएसएड’च्या मदतनिधी कपातीच्या निर्णयात अमेरिकी संघीय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हस्तक्षेप केला. फेडरल न्यायालयाने ट्रम्प प्रशासनास इतर देशांना दिल्या जाणाऱ्या अब्जावधी डॉलरची मदत देण्याप्रकरणी मध्यरात्रीपर्यंत मुदत दिली होती. या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. याबाबत वरिष्ठ न्यायालयात जोवर सर्वार्थाने विचार केला जात नाही तोवर ही स्थगिती कायम राहील. (वृत्तसंस्था)
नेमके प्रकरण काय?
ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर ‘डोज’चे प्रमुख मस्क यांनी विविध देशांना दिल्या जाणाऱ्या निधीचे धोरण पैशाची नासाडी असल्याचे नमूद करीत हा निधी बंद करण्याची शिफारस केली. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने हा निधी बंद केला.
व्हेनेझ्युएलास धक्का
व्हेनेझ्युएलातून इंधन तेल काढून ते निर्यात करण्याची परवानगी असलेला अमेरिकी कंपनीचा परवाना ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे. यामुळे या छोट्या देशाची आर्थिक नाडी आवळली जाणार असून, व्हेनेझ्युएलास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
भारतीयांना अमेरिकी कंपन्यांत अशी मिळेल संधी
अमेरिकेत प्रस्तावित ‘गोल्ड कार्ड’ योजनेमुळे तेथील कंपन्यांना हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डसारख्या विद्यापीठांत शिकलेल्या भारतीय पदवीधारकांना नियुक्त करण्याची परवानगी मिळणार आहे. या योजनेत सुमारे ४४ कोटी रुपये शुल्क भरून अमेरिकेत राहण्याचा, काम करण्याचा अधिकार मिळेल. स्वत: ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे ग्रीन कार्ड असेल आणि हे एक गोल्ड कार्ड घेतले तर ग्रीन कार्डचे सर्व अधिकार त्याला मिळतील. शिवाय अमेरिकी नागरिकत्व मिळवण्याचे मार्गही मोकळे होतील.
या ‘गोल्ड कार्ड’ खरेदीतून मोठा महसूल मिळवण्याचा ट्रम्प यांचा हेतू आहे. शिवाय, हेच श्रीमंत लोक अमिरिकेत वास्तव्यास राहिले तर मोठ्या प्रमाणात कर भरतील. विशेष म्हणजे रशियन लोकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा ट्रम्प यांचा विचार असून काही रशियन लोक खूपच चांगले आहेत, ते ५ दशलक्ष डॉलर खर्च करू शकतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.