...तर ट्रम्प असतील धोकादायक अध्यक्ष
By Admin | Published: August 10, 2016 03:47 AM2016-08-10T03:47:02+5:302016-08-10T03:47:02+5:30
डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तर ते धोकादायक अध्यक्ष असतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या ५० राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांनी दिला
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तर ते धोकादायक अध्यक्ष असतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या ५० राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांनी दिला आहे. देशाच्या सुरक्षेला ट्रम्प धोक्यात टाकू शकतात, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यात गुप्तचर आणि राजकीय विषयातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी या तज्ज्ञांवर पलटवार करताना म्हटले आहे की, वॉशिंग्टनच्या या उच्चभू्र नागरिकांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, आज जगात एवढी गोंधळाची परिस्थिती का निर्माण झाली आहे? ट्रम्प यांच्याबाबत बोलताना राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे की, आमच्यापैकी कोणीही डोनाल्ड ट्रम्प यांना
मतदान करणार नाही. कारण, विदेशनीतीच्या दृष्टीने ट्रम्प हे अध्यक्ष आणि कमांडर इन चीफ बनण्याच्या पात्रतेचे नाहीत. आम्हाला खात्री आहे की, ते जर अध्यक्ष झाले, तर ते अतिशय धोकादायक असतील. देशाची सुरक्षा आणि स्वास्थ्य ते धोक्यात टाकतील.
या पत्रात तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, ट्रम्प यांच्यात अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक चरित्र, मूल्य आणि अनुभव यांची कमतरता आहे. (वृत्तसंस्था)