ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार; इवांका यांनी स्वीकारलं मोदींचं निमंत्रण
By admin | Published: June 27, 2017 09:56 AM2017-06-27T09:56:25+5:302017-06-27T11:43:29+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी भारतात यावं,असं आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 27- डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते. सोमवारी रात्री उशीरा साधारण 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी भारतात यावं,असं आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिलं आहे. त्यांनी ते स्वीकारलं असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपतींनी सहकुटुंब भारतात येण्याचं मी त्यांना निमंत्रण देतो, त्यांचं स्वागत करण्याची मी वाट पाहत आहे, असं म्हणत मोदींनी ट्रम्प यांनाही निमंत्रण दिलं. ट्रम्प यांनी मोदींचं निमंत्रण स्वीकारलं असून अजून नेमकी तारीख नक्की झालेली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर इवांका ट्रम्प यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले. भारतात होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी मला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं, यासाठी धन्यवाद, असं ट्विट इवांका ट्रम्प यांनी केलं आहे.
Thank you, Prime Minister Modi, for inviting me to lead the U.S. delegation to the Global Entrepreneurship Summit in India this fall. pic.twitter.com/ZNwmTTnGYD
— Ivanka Trump (@IvankaTrump) June 27, 2017
सोमवारी रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये उत्साहात स्वागत केलं. व्हाइट हाउसमध्ये प्रवेश करताना त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. या वर्षी भारत स्वातंत्र्यांचं 70 वं वर्ष साजरं करणार आहे, याबाबत मी भारताच्या जनतेचं अभिनंदन करतो. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारावेळी मी भारत अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं म्हटलं होतं आणि ते खरं ठरलं आहे, असं म्हणतं डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं.
तसंच द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महान पंतप्रधान असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. ट्रम्प म्हणाले, मोदी महान पंतप्रधान आहेत, माझं त्यांच्यासोबत बोलणं होत असतं, मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.
पंतप्रधान मोंदींनी ट्रम्प परिवाराला दिलेलं आमंत्रण इवांका यांनी स्वीकारलं आहे पण भारतात ट्रम्प परिवार कधी येणार याची तारीख निश्चित झालेली नाही.