ट्रम्प यांची कन्या इवानका करणार हिंदू मंदिरात दिवाळी साजरी
By admin | Published: October 23, 2016 08:25 AM2016-10-23T08:25:29+5:302016-10-23T08:25:29+5:30
अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवानका हिंदू मंदिरात यंदाची दिवाळी साजरी करणार
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 23 - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवानका हिंदू मंदिरात यंदाची दिवाळी साजरी करणार आहे. अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांसोबत वर्जिनियास्थित एका हिंदू मंदिरात ती हा दिवाळीचा सण साजरा करणार आहे. अमेरिकेतल्या भारतीय समुदाय हा ट्रम्प यांचा पारंपरिक मतदार समजला जातो. त्यादृष्टीनंच ट्रम्प यांच्या कन्येनं हिंदूंसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदाच्या दोन मातब्बर उमेदवारांपैकी एका कुटुंबीयाचा सदस्य हिंदू मंदिराचा दौरा करणार आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींची स्तुती करून अमेरिकेतल्या भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.
ते म्हणाले "मला हिंदूंबद्दल आदर आहे. अध्यक्ष झालो तर भारतासोबतचे संबंध आणखी बळकट करेन. मी अध्यक्ष झालो तर भारतीय आणि हिंदू समुदायाचा खरा मित्र व्हाइट हाऊसमध्ये असेल याची खात्री देतो", भारताला नरेंद्र मोदी वेगानं विकासमार्गावर नेत आहेत", असं म्हणत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. हा आदर फक्त हिंदूंबद्दलच का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ट्रम्प म्हणाले होते की, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर भारताबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. भारतात रिअल इस्टेटमध्ये नोकऱ्या वाढत असल्याचे मी पाहत आहे. हे चांगले संकेत आहेत. भारत एक शानदार देश आहे. रिपब्लिकन हिंदू आघाडीच्या निधी उभारणी कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गोपनीय माहितीचे आदानप्रदान मी करेन. दोन्ही देशांतील लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन भारतासोबत खांद्याला खांदा लावून काम करेन. भारत आणि अमेरिका उत्तम मित्र होतील, असंही ट्रम्प यांनी सांगितलं होतं.