ट्रम्प यांचे माजी अटर्नी कोहेन यांना कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:26 AM2018-12-15T03:26:50+5:302018-12-15T03:27:12+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी अँटर्नी व त्यांचे निवडणुकांपासून अनेक व्यवहार सांभाळणारे सहकारी मायकल कोहेन यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी अँटर्नी व त्यांचे निवडणुकांपासून अनेक व्यवहार सांभाळणारे सहकारी मायकल कोहेन यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमेरिकी काँग्रेसला खोटी माहिती पुरविणे, ट्रम्प यांच्याशी असलेल्या प्रेमप्रकरणांची वाच्यता करू नये, यासाठी त्यांच्या दोन माजी प्रेयसींना पैसे देणे, असे गुन्हे कोहेन यांच्यावर दाखल करण्यात आले होते.
आपल्याकडून जे कायदाबाह्य व चुकीचे वर्तन घडले त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचे कोहेन यांनी न्या. विलियम पॉली यांना बुधवारी सांगितले. हे सांगताना ते भावनाशील झाले होते. मॉस्कोतील संभाव्य ट्रम्प टॉवरच्या प्रकल्पाबद्दलही कोहेन यांनी अमेरिकी काँग्रेसला चुकीची माहिती दिली होती. त्या गुन्ह्यासाठी त्यांना आणखी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
२०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचार मोहिमेसाठी ट्रम्प यांच्या वतीने जो खर्च करण्यात आला त्याची जबाबदारी कोहेन यांच्याकडे होती. तो निधी वापरतानाही बँकेमध्ये उलटसुलट व्यवहार तसेच करचुकवेगिरी केल्याचे उजेडात आले होते.
शिक्षा कमी करण्यास नकार
ट्रम्प उमेदवार होते त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता का, याची रॉबर्ट मुल्लर चौकशी करीत आहेत. त्यांनाही कोहेन यांची लबाडी लक्षात आली. ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याला कारावासाची शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ट्रम्प यांच्याबरोबर काम करताना आपली अवस्था कैदेत ठेवलेल्या व्यक्तीसारखी झाली होती, असे मायकल कोहेन यांनी न्यायालयाला सांगितले होते. शिक्षेचा कालावधी कमी करावा, अशी कोहेन यांच्या वकिलाने केलेली विनंती न्यायालयाने अमान्य केली.