ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करणारा ठराव संमत, ‘डेमोक्रॅटिक’ची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:50 AM2020-01-11T05:50:56+5:302020-01-11T05:51:36+5:30
इराणविरुद्ध युद्ध छेडण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अधिकार मर्यादित करणारा एक प्रतीकात्मक ठराव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने गुरुवारी संमत केला.
वॉशिंग्टन : इराणविरुद्ध युद्ध छेडण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अधिकार मर्यादित करणारा एक प्रतीकात्मक ठराव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने गुरुवारी संमत केला. या सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असून तिथे हा ठराव २२४ विरुद्ध १९४ मतांनी मंजूर झाला.
अमेरिकेवर इराणने हल्ले चढविल्यास ती अपवादात्मक स्थिती वगळून त्या देशाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकी सिनेटची मंजूरी घ्यायला हवी यासाठीही हा ठराव करण्यात आला आहे. इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्याद्वारे अमेरिकेने ठार मारले. त्यानंतर इराण व अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली.
या सगळ्या घडामोडींमुळे मध्य पूर्वेत खळबळ माजली आहे. मात्र इतके होऊनही अमेरिका व इराणने युद्ध पुकारलेले नाही. हाऊस आॅफ रिप्रेझेन्टेटिव्हजने ठराव जरी संमत केला असला तरी त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या व्हेटोच्या अधिकाराला धक्का लागणार नाही. अमेरिकेने युद्ध पुकारण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचे परीक्षण करण्याचा हक्क अमेरिकी काँग्रेसला १९७३च्या युद्धविषयक अधिकार कायद्यामुळे मिळाला आहे असे या ठरावात म्हटले आहे.
इराणच्या जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या करून अमेरिकेला सुरक्षित केले हा ट्रम्प यांचा दावा चुकीचा आहे अशी टीका डेमोक्रॅ्रटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पलोसी यांनी केली आहे. (वृत्तसंस्था)
इराणच्या क्षेपणास्त्रानेच पडले विमान : जॉन्सन
युक्रेनचे विमान पाडल्याचा आरोप इराणने फेटाळून लावला आहे. तथापि, कॅनडा सरकारला आपली गोपनीय माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, हे विमान जाणूनबुजून पाडलेले नसू शकते; पण ते इराणच्या क्षेपणास्त्रानेच पडले आहे. या तपासात सहभागी होणार असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाने म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही एका व्हिडिओची खातरजमा केली. यात एक वस्तू आकाशात उडताना दिसत आहे आणि त्यानंतर काही सेकंदात मोठा धमाका होतो.
युक्रेनने संयुक्त राष्ट्रांकडे व्यापक चौकशीची मागणी केली आहे. युक्रेनचे ४५ विमानतज्ज्ञ आणि सुरक्षा अधिकारी तपासासाठी इराणला पोहोचले आहेत.