ट्रम्प यांनी ‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ आदेशावर केली स्वाक्षरी
By admin | Published: April 19, 2017 07:46 AM2017-04-19T07:46:11+5:302017-04-19T07:46:11+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 19 - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांत लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसामुळे स्थानिक अमेरिकी बेरोजगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप असून, त्यावर बंधने आणण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. त्यानुसार ट्रम्प आता ‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ नावाचा आदेश जारी केला. या आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी ते अमेरिकी लोकप्रतिनिधी सभागृहाचे सभापती पॉल रेयॉन यांचे गृहराज्य विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी शहरात गेले होते.
अधिक कुशलता आणि योग्यता या आधारावर नवीन इमिग्रेशन प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सूत्रांनी सांगितले. २0१८ या वित्त वर्षासाठी एच-१ बी व्हिसाची संगणकीकृत लॉटरी सोडत पूर्ण करण्यात आली आहे.
यंदा दोन लाख अर्ज; पण परवानगी ६५ हजारांनाच
या वर्षाच्या व्हिसासाठी १,९९,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. लोकप्रतिनिधीगृहाने ६५ हजार जणांनाच एच-१ बी व्हिसा देण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकी शिक्षण संस्थांत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या २0 हजार एच-१ बी व्हिसासाठी सोडत काढण्यात आली आहे. या लॉटरी पद्धतीच्या सोडतीला प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विरोध केला आहे. विदेशातून स्वस्तात मनुष्यबळ आणून कंपन्या स्थानिक अमेरिकी नागरिकांना बेरोजगार करीत आहेत, असा आरोप या अधिकाऱ्याने केला.