शटडाऊन संपविण्यासाठी ट्रम्प यांची तात्पुरत्या कराराला स्वीकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:25 AM2019-01-27T04:25:50+5:302019-01-27T06:46:06+5:30
कायदेशीर स्वरुप; दोन्ही सभागृह आणि सिनेटमध्ये ठराव पारित
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन संपविण्यासाठी तात्पुरत्या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे. मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयाला डेमॉक्रॅट सदस्यांनी विरोध केल्यानंतर ट्रम्प यांनी राजकीय दबावासमोर झुकत हा करार मान्य केल्याचे मानले जाते.
या समझोत्यामुळे ३५ दिवसांचे शटडाऊन संपविण्यावर तोडगा निघाला असला तरी प्रस्तावित सीमा भिंतीवरून निर्माण झालेला संघर्ष संपलेला नाही. ही भिंत बांधण्यासाठी ट्रम्प यांनी ५.७ बिलीयन अमेरिकन डॉलर देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. डेमॉक्रॅटस्नी त्याला विरोध केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे कर्मचाऱ्यांना पगार कपातीला सामोरे जावे लागले. गेल्या २२ डिसेंबरपासून सुरू झालेल्या शटडाऊनचा फटका आठ लाख फेडरल कर्मचाऱ्यांना बसला आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात मेक्सिकोलगत भिंत बांधण्याची घोषणा केली होती. १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारला निधी पुरविण्याच्या कराराला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला असून अमेरिकन संसद सदस्यांनी स्थलांतरणावर व्यापक करार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. संबंधित योजनेला दोन्ही सभागृह आणि सिनेटने शुक्रवारी ध्वनिमताने पाठिंबा दिला. या कराराला कायद्याचे स्वरुप प्राप्त झाले असून त्यावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिला आहे.
कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा....
या तात्पुरत्या करारामुळे फेडरल कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून हे कर्मचारी पगाराविना काम करीत होते किंवा त्यांच्यावर नोकरी सोडण्याची पाळी आली होती. या निर्णयामुळे विमानसेवा उद्योगावरील ताण कमी झाला आहे. विमानतळ सुरक्षा आणि हवाई नियंत्रण सेवेत कर्मचाºयांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. रोज गार्डन येथे भाषण देताना ट्रम्प यांनी उपरोक्त कराराची घोषणा केली. मेक्सिको सीमेवर देखरेख ठेवणाºया होमलॅन्ड सिक्युुरिटीला निधी पुरविण्यासाठी माझी वर्षभर हाऊस आणि सिनेटमध्ये वाटाघाटी घडवून आणण्याची तयारी असून ते काम मी सुरू करणार आहे. गेल्या ३६ दिवसांपासून मी डेमॉक्रॅटस् आणि रिपब्लिकन सदस्यांचे मत ऐकून घेत आहे, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांचा पराभव?
अमेरिकेत येणाºया बेकायदेशीर स्थलांतरितांना प्रतिबंध घालण्यासाठी मेक्सिको सीमेलगत भिंत बांधण्याची आवश्यकता असल्याचे ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले असले तरी त्यांना त्यासाठी निधी मिळवता येणार नाही, हा त्यांचा पराभव असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. दुसरीकडे ही डेमॉक्रॅटस्ला दिलेली सवलत नाही. निधी न मिळाल्यास पुन्हा एकदा शटडाऊन किंवा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.