Liz Truss : ट्रस यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ठरल्या इंग्लंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 07:32 IST2022-09-07T07:31:51+5:302022-09-07T07:32:47+5:30
महाराणी एलिझाबेथ द्वितीय (९६) यांच्या स्कॉटलंड येथील निवासस्थानी लिज ट्रस दाखल झाल्या. तत्पूर्वी, बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सोपविला.

Liz Truss : ट्रस यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ठरल्या इंग्लंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान
लंडन : कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिज ट्रस (४७) यांची मंगळवारी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. वाढत्या ऊर्जासंकटाचा सामना करण्यासाठी दबाव आणि वाढत्या किमतँच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय (९६) यांच्या स्कॉटलंड येथील निवासस्थानी लिज ट्रस दाखल झाल्या. तत्पूर्वी, बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सोपविला. लिज ट्रस या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या शासनकाळात देशाच्या १५व्या पंतप्रधान आहेत. पहिले पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे १९५२ मध्ये पंतप्रधान झाले होते. डाउनिंग स्ट्रीटमध्येही मोठे परिवर्तन होऊ शकते आणि जॉन्सन यांच्या कार्यकाळातील काही वरिष्ठ अधिकारी यांना हटविले जाऊ शकते किंवा दुसऱ्या ठिकाणी पाठविले जाऊ शकते.
मंत्रिमंडळात काेण?
ट्रस यांच्या टीममध्ये ॲटर्नी जनरल सुएला ब्रेवरमॅन या एकमेव भारतीय वंशाच्या संसद सदस्य असू शकतात. गोवा वंशाच्या ब्रेवरमॅन यांना माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांची जागा दिली जाऊ शकते. क्वासी क्वारतेंग यांचे नाव वित्त मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.