डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 02:48 AM2016-06-22T02:48:45+5:302016-06-22T02:48:45+5:30
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लास वेगास : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मायकेल सँडफोर्ड असे त्याचे नाव असून, नेवाडा येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या मायस्टर थिएटरमधील सभेदरम्यान मायकेलने पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचे हे प्रयत्न पोलिसांनी उधळून लावले. ट्रम्प यांना ठार करण्यासाठी आपण कॅलिफोर्नियाहून येथे आलो असल्याचे त्याने सांगितले.
मायकेल गेल्या दीड वर्षापासून ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. यापूर्वी त्याने बंदूक चालविलेली नाही. ऐनवेळी गोळी चालविताना गफलत होऊ नये म्हणून घटनेच्या एक दिवस आधी त्याने येथील फायरिंग रेंजवर जाऊन सराव केल्याचेही तपासात समोर आले. लास वेगास येथील प्रयत्न अयशस्वी झाल्यास नंतरच्या सभेत ट्रम्प यांना मारण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने ट्रम्प यांच्या फिनिक्स येथील सभेची तिकिटे खरेदी केली होती. मायकेल दोषी आढळून आल्यास त्याला दहा वर्षांचा कारावास होऊ शकतो.
आपण एक किंवा दोन फेरी झाडू शकलो असतो आणि असा प्रयत्न करताच पोलिसांच्या हातून आपण मारलो गेलो असतो याची आपणास पूर्ण कल्पना असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. (वृत्तसंस्था)