कोहिनूर हिरा आणण्याचे प्रयत्न
By admin | Published: November 9, 2015 11:22 PM2015-11-09T23:22:46+5:302015-11-09T23:23:14+5:30
भारतातून इंग्लंडमध्ये गेलेला कोहिनूर हिरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा कोहिनूर जगात सर्वात मोठा हिरा असून त्याची आजची किंमत १०० दशलक्ष पौंड आहे
लंडन : भारतातून इंग्लंडमध्ये गेलेला कोहिनूर हिरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा कोहिनूर जगात सर्वात मोठा हिरा असून त्याची आजची किंमत १०० दशलक्ष पौंड आहे. असा हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटात स्थान मिळविलेला असला तरी भारताला तो परत हवा आहे.
कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी लंडनच्या उच्च न्यायालयात कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि व्यावसायिकांच्या गटाने वकिलांना दिल्या आहेत. भारताचा हा दावा ब्रिटनने फेटाळून लावला आहे.
या गटाचे नाव ‘माऊंटेन आॅफ लाईट’ असे आहे. या गटाशी संबंधित व बॉलीवूड स्टार भूमिका सिंह हिने हा हिरा आमची संस्कृती व इतिहासाचा भाग असल्याचे सांगितले.
१९३७ मध्ये महाराणीचे पती किंग जॉर्ज (पाचवे) यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी हा कोहिनूर हिरा राणीच्या मुकुटावर होता. १९५३ मध्ये क्वीन एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळीही कोहिनूर त्यांच्या मुकुटावर होता.
ब्रिटिशांनी पंजाब खालसा केल्यानंतर १०५ कॅरेटचा हा हिरा शिखांचे शेवटचे राजे दुलीप सिंग यांनी राणीला भेट दिला होता.
> इतिहासकार अॅन्ड्रु रॉबर्टस् यांनी ‘संडे मेल’ला सांगितले की, कोहिनूर हिऱ्यासाठी ब्रिटिश मुकुट ही अतिशय योग्य जागा आहे. या हिऱ्याबद्दल जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार हा हिरा केवळ देवाच्या मस्तकावर असू शकतो. परंतु जर मानवाने तो वापरला तर त्याचा दुर्दैवी अंत होईल.