Turkey Earthquake: तुर्की अन् ग्रीस येथे भूकंपाचा धक्का; आतापर्यंत २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी
By प्रविण मरगळे | Updated: October 31, 2020 07:38 IST2020-10-31T07:36:47+5:302020-10-31T07:38:15+5:30
Turkey Earthquake: युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते.

Turkey Earthquake: तुर्की अन् ग्रीस येथे भूकंपाचा धक्का; आतापर्यंत २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी
इस्तांबूल - तुर्की आणि ग्रीस किनारपट्टीच्या दरम्यान एजियन समुद्रात शुक्रवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्तांबूलमधील इज्मीर जिल्ह्यात सेफेरिसारमध्येही सौम्य प्रमाणात त्सुनामीची लाट आली. त्याच वेळी ग्रीसच्या सामोस द्वीपकल्पात ४ लोक किरकोळ जखमी झाले.
युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते. त्याच वेळी अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता ७.० होती. भूकंपाचे केंद्रस्थान एजियन समुद्रात १६.५ किमी खाली होते. भूकंपाची तीव्रता ६.६ नोंदविली गेली आहे असं तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
अनेक इमारती कोसळल्या, बचावकार्य सुरूच
सर्वाधिक विनाश तुर्कीच्या तिसर्या क्रमांकाच्या इज्मीर शहरात झाला. या शक्तिशाली भूकंपामुळे पश्चिम तुर्कीच्या इज्मीर प्रांतातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ग्रीसच्या सामोसमध्येही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तुर्कीच्या माध्यमांनी मध्य इज्मीरमधील एका बहुमजली इमारतीचा ढासळलेला ढाचा दाखवला. याशिवाय बचाव कार्य करणारे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत. मध्य इज्मीरमध्ये अनेक ठिकाणी हवेत धूर पसरल्याचे फोटोही समोर आले आहेत.
इज्मीरचे राज्यपाल यावूज सलीम कोसगार म्हणाले की, ढिगाऱ्यातून जवळपास ७० जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. चार इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. याशिवाय अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. इज्मीरमध्ये ३८ रुग्णवाहिका, दोन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आणि ३५ बचाव दल कार्यरत आहेत. किमान १२ इमारतींमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे.
त्याच वेळी ग्रीसमधील माध्यमांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्याने सामोस व इतर द्वीपकल्पातील लोकांना तातडीनं घराबाहेर काढण्यात आलं. याशिवाय येथे एक दरड कोसळल्याची बातमी आहे.
यापूर्वी तुर्कीमध्ये भीषण भूकंप झाला आहे
जानेवारी महिन्यात तुर्कीच्या सेव्ह्रिस येथे झालेल्या भूकंपात ३० हून अधिक लोक ठार तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले होते. त्याच वेळी तुर्कीच्या इजमित शहरात १९९९ साली भूकंपामुळे १७ हजार लोक मरण पावले होते.