तुर्कीतील भूकंपाची आधीच केली गेली होती भविष्यवाणी, आता भारत-पाकिस्तानला इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 08:21 AM2023-02-10T08:21:06+5:302023-02-10T08:22:33+5:30
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भूकंपातील जीवितहानी पाहून संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. पण या भूकंपाचं भाकीत डच संशोधक फ्रँक हॉगरबिट्स यांनी आधीच केलं होतं, जे खरं ठरलं आहे. त्याचवेळी त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली आहे जी भारत आणि पाकिस्तानला इशारा देणारी आहे. फ्रँक हॉगरबिट्स यांच्या दाव्यानुसार आता आशियाई देश आपत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. सोशल मीडियावर फ्रँकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी करताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रँक हॉगरबिट्स म्हणाले की, आता आशियाई देशांना भूकंप किंवा तुर्कीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची वेळ आली आहे. फ्रँकने दावा केला की पुढील भूकंप अफगाणिस्तानपासून सुरू होईल आणि पाकिस्तान आणि भारतातून पुढे जाऊन हिंदी महासागरात संपेल. मोहम्मद इब्राहिम नावाच्या एका ट्विटर युजरने माहिती दिली की डच संशोधक फ्रँक हॉगरबीट्स यांनी तीन दिवसांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाची भविष्यवाणी केली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा भाकीत केलं आहे.
Let me be clear: the purple bands do NOT indicate a potential rupture zone (sic). They mark regions at the time of atmospheric fluctuations relative to the Sun and a larger tremor may occur in or near that band. I explained this multiple times in videos. No room for wild ideas. https://t.co/3kTM6x9p9M
— Frank Hoogerbeets (@hogrbe) February 8, 2023
आशियाई देश भूकंपाचे शिकार
जर आपण वातावरणातील चढ-उतार पाहिल्यास आशियाई देश भूकंपाचे बळी ठरतील हे स्पष्ट असल्याचं फ्रँक हॉगरबीट्स यांनी म्हटलं आहे. भूकंप काही सांगून येत नाही, त्यामुळे हा अंदाज तात्पुरता आहे. सर्वच भूकंप नेहमीच शोधता येत नाहीत, असंही ते पुढे म्हणाले. फ्रँक हॉगरबीट्स सोलर सिस्टीम जिओमेट्री सर्व्हे (SSGS) नावाच्या संस्थेत संशोधक आहेत.
१९९९ साली आला होता विनाशकारी भूकंप
तुर्कीमध्ये अनेकदा भूकंप होत असतात. १९९९ च्या भूकंपात सुमारे १८,००० लोकांचा मृत्यू झाला होता आणि ४५,००० हून अधिक लोक जखमी झाले होते. गोलकुक आणि देउझ प्रांतात ७.४ आणि ७.० तीव्रतेचे दोन भूकंप झाले होते. २०११ मध्ये, पूर्वेकडील वॅन शहरात ७.१ तीव्रतेच्या भूकंपात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यावेळी आतापर्यंत २०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भूकंपाची भविष्यवाणी
अहवालानुसार, ३ फेब्रुवारी २०२३ च्या भूकंपाच्या तीन दिवस आधी, नेदरलँड-आधारित सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGS) साठी काम करणार्या डच संशोधक फ्रँक हॉगरबिट्स यांनी याचा अंदाज वर्तवला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन या प्रदेशात लवकरच ७.५ तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता वर्तवली होती.