तुर्कस्तानने रशियाचे विमान पाडले
By admin | Published: November 25, 2015 12:17 AM2015-11-25T00:17:37+5:302015-11-25T00:17:37+5:30
नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कस्तानने मंगळवारी सीरियन सीमेवर रशियाचे लढाऊ विमान पाडले. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या घटनेला पाठीत खंजीर खुपसण्याचे
अंकारा : नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कस्तानने मंगळवारी सीरियन सीमेवर रशियाचे लढाऊ विमान पाडले. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या घटनेला पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य संबोधल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव उफाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तुर्की, रशिया हे दोन्ही देश सीरिया यादवीतील महत्त्वाची पात्रे आहेत.
रशियन लढाऊ विमानाने सीरियन हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्याला पाच मिनिटांत दहा इशारे देण्यात आले. मात्र, वैमानिकाने इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने दोन तुर्किश एफ-१६ विमानांनी ते पाडले, असे तुर्किश लष्कराने सांगितले. विमान सीरियाच्या हद्दीत होते असे जोर देऊन सांगत रशियाने ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केल्याने दोन्ही देशांत मोठा राजकीय पेच निर्माण होण्याचा धोका आहे.
विमानात दोन वैमानिक होते. ते जीवंत आहेत. विमान कोसळल्यानंतर ते पॅराशूटद्वारे खाली उतरले. एका वैमानिकाला विरोधी दलांनी पकडले, असे तुर्किश अधिकाऱ्याने सांगितले.
तथापि, सीरियातील विरोधी सूत्रांच्या माहितीनुसार, एक वैमानिक ठार झाला, तर दुसरा बेपत्ता आहे. तुर्किश एफ-१६ विमानांनी हल्ला केल्यानंतर रशियन विमानाचा आकाशातच स्फोट होऊन ते सीमेच्या सीरियन बाजूकडील पर्वतात कोसळले. सीरियाच्या आकाशात रशियासह अमेरिका, फ्रान्स, तुर्की आणि आखाती देशांच्या विमानांची सदोदित उपस्थिती असते. यातून नको ती घटना घडून मोठा मुत्सद्दी आणि लष्करी पेच निर्माण होण्याची शंका दीर्घकाळापासून व्यक्त करण्यात येत होती. या घटनेने ती खरी ठरली. एसयू-२४ या रशियन विमानाने तुर्कीच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. इशारे देऊनही फरक पडला नाही. त्यामुळे हे विमान पाडण्यात आले, असे तुर्किश राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे. तुर्कीने अंकारातील रशियन राजदूताला पाचारण केले आहे. रशियन विमानाने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याबद्दल तुर्की रशियन राजदूताकडे निषेध नोंदविला.
णार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियाने आपले विमान पाडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, हे विमान लढाऊ विमानांद्वारे नाही, तर जमिनीवरून मारा करून पाडण्यात आल्याचे म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी या घटनेला पाठीत खंजीर खुपसण्याची कृती संबोधून गंभीर परिणामाचा इशारा दिला आहे. विमान पाडणारे ‘दहशतवाद्यांचे साथीदार’ असल्याचे त्यांनी संबोधले आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह उद्या तुकस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते. पण एक दिवस अगोदरच ही घटना घडल्याने त्यांनी त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द केला आहे.